वॉशिंग्टन – अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्ष अलीकडच्या काळात पुन्हा तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी आपण बोललेलो नाही आणि त्यांच्याशी
बोलण्याचीही आपली इच्छा नाही असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
आज व्हाईट हाऊसवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चीनवर त्यांनी यावेळी पुन्हा करोनाचा प्रसार केल्याबद्दल टीकास्त्र सोडले. चीनला करोनाचा प्रसार रोखता आला नाही, तेथूनच तो संपूर्ण जगात पसरला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
करोनाच्या प्रसाराबद्दल चीनला दोषी ठरवण्यात आम्ही काहींही चूक करीत नाही, त्यांना या रोगाचा प्रसार त्यांच्या देशातच थांबवता आला असता. पण त्यांनी ते केले नाही. उलट त्यांनी करोनाच्या बाबतीत गुप्तता पाळली. त्याचे परिणाम आज साऱ्या जगाला भोगावे लागत आहेत, असे ते म्हणाले.
या साऱ्या घडामोडीत जागतिक आरोग्य संघटनेनेही त्यांचीच पाठराखण केली ही अधिक संतापजनक बाब आहे, असे ते म्हणाले. ही संघटना म्हणजे चीनची कळसूत्री बाहुली आहे, असा आरोपही त्यांनी केला. चीनच्या बाबतीत आपले अध्यक्षीय निवडणुकीतील विरोधक ज्यो बिडेन हे मवाळ भूमिका घेत असल्याची टीका ट्रम्प यांनी केली.
चीन ही आपली समस्या नाही, असे बिडेन यांचे विधान अत्यंत भयानक आहे. ते स्वतः जसे भयानक आहेत तसेच त्यांची ही विधानेही भयानक आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. बिडेन हे चीनचीच
भलावण करताना दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला.