शिक्रापूर -दरेकरवाडी (ता. शिरूर) गावच्या ग्रामपंचायतीने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावामध्ये विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली असून आता गावातील सर्व मुख्य रस्ते पूर्णपणे बंद करून गावामध्ये प्रवेशबंदी केली आहे.
सणसवाडी येथील एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे समोर आले असताना परिसरात एकच खळबळ उडाली आणि त्यानंतर अनेक गावांनी चांगलाच धसका घेतला असताना दरेकरवाडी या गावाने देखील करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
गावातील प्रत्येक घरात जाऊन करोना जनजागृती करीत बाहेर गावाहून आलेल्या कोणत्या व्यक्तीस सर्दी, खोकला यांसह आदी त्रास होत असल्यास आरोग्य सेवकांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तर दरेकरवाडी गावाला जोडणारे सर्व मुख्य रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. या रस्त्यांवर गावात प्रवेश बंदचे फलक लावण्यात आले आहे.
यावेळी सरपंच प्रमिला दरेकर, हिरामण दरेकर, ग्रामविकास अधिकारी विकास विसे, आरोग्यसेविका कल्याणी दीक्षित, अंगणवाडीसेविका मंदाकिनी दरेकर, ज्योती काशीकर, पोलीसपाटील पांडुरंग दरेकर आदी उपस्थित होते.
तर यावेळी गावामध्ये बाहेरगावी राहणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाने गावात येताना प्रथम सर्व माहिती आरोग्य अधिकारी व पोलीस पाटील यांना देऊन योग्य खबरदारी घेऊनच यावे तसेच कोणत्याही नागरिकांनी घराबाहेर न पडता आपल्यावर आलेले संकट रोखण्यास मदत करावी, असे आवाहन माजी उपसरपंच हिरामण दरेकर यांनी केले आहे.