Nitish Kumar : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार वाराणसीत प्रचार करण्यासाठी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एनडीए आघाडीचा पराभव करण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी मिळून इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. त्यामुळे जनता दल (युनायटेड) नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यूपीमधून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशा चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून जिंकून पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. अशा स्थितीत इंडिया आघाडीच्या वतीने नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर वाराणसीतून प्रचाराची सुरुवात करणार आहेत. त्यांना इंडिया आघाडीचा पंतप्रधान चेहरा म्हणून नाव दिले जाण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी 24 डिसेंबर रोजी नितीश कुमार वाराणसीमध्ये त्यांची पहिली जाहीर सभा घेणार आहेत. वाराणसीच्या कुर्मी व्होट बँकेवर विजय मिळवण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार वाराणसीच्या रोहनिया येथे एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या वृत्ताला बिहारचे कॅबिनेट मंत्री आणि जेडीयूचे संघटन मंत्री यांनी दुजोरा दिला आहे. सध्या नितीशकुमार उत्तर प्रदेशातील फुलपूर, बनारस आणि आंबेडकर नगरमधून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे, नितीश कुमार प्रतापगडमधूनही निवडणूक लढवू शकतात, असे सांगण्यात येत आहे.
24 डिसेंबरला नितीश कुमार यांच्या वाराणसीत निवडणूक रॅलीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 डिसेंबरला वाराणसीत येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात वाराणसीतूनच करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कार्यकाळात ४३ व्यांदा वाराणसीला भेट देत आहेत. यावेळी ते वाराणसीमध्ये डझनभराहून अधिक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.