Nawab Malik : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नवाब मलिक अजित पवार गटात जाणार की शरद पवार गटात हा प्रश्न उपस्थित केला जात होता. यातच अधिवेशनादरम्यान नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. या प्रकरणावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहीत नवाब मलिक यांना महायुतीत घेता येणार नसल्याचे म्हटले. यावर आता नवाब मलिक यांना महायुतीत घेता येणार नसल्याचे म्हटले.
मनसेची पोस्ट
मनसेनं नवाब मलिक मुद्यावरून खोचक शब्दात टीका करताना अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते प्रफुल पटेल यांचे इक्बाल मिर्चीसोबत असलेल्या संबंधांकडे लक्ष वेधत हल्लाबोल केला आहे. मनसेनं हिंदुत्वाच्या श्रीखंडात देशद्रोह्यांची ‘मिर्ची’ टाकणं महायुतीच्या ‘प्रफुल्लित’ कार्यकर्त्यांना ‘पटेल’ ? आणि हो, ‘नवाब’चाही ‘जवाब’ ‘पटेल’ असाच द्या. ट्विटसोबत प्रफुल पटेल यांची इक्बाल मिर्ची केसमध्ये चार फ्लोअर जप्त करण्यात आले होते, त्या बातमीचा जुना स्क्रीनशाॅट जोडला आहे.
हिंदुत्वाच्या श्रीखंडात देशद्रोह्यांची ‘मिर्ची’ टाकणं महायुतीच्या ‘प्रफुल्लित’ कार्यकर्त्यांना ‘पटेल’ ? आणि हो, ‘नवाब’चाही ‘जवाब’ ‘पटेल’ असाच द्या. pic.twitter.com/5LbcnsWHex
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 9, 2023
काय आहे नेमकं प्रकरण?
प्रफुल पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कंपनीनं सीजे हाऊस बिल्डिंग बांधली होती. याच भूखंडावर कुख्यात तस्कर आणि गँगस्टर इक्बाल मिर्ची यांच्या मालकीची काही मालमत्ता होती. इमारत उभी राहिल्यानंतर त्यात इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांना दोन मजले देण्यात आले होते. हे मजलेही ईडीनं मागील वर्षी सील केले आहे. भाजपनं मलिकांचा मुद्दा लावून धरले आहे तर विरोधकांनी पटेलांचा मुद्दा पुन्हा उकरुन काढला आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रकरण वेगळं असल्याचे सांगत पटेलांवर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.
अंबादास दानवे यांचे फडणवीसांना पत्र
दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहीत दाऊदच्या खास हस्तकासोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेल्या खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत तुमची भूमिका काय? असा सवाल केला आहे. अंबादास दानवे यांनी पत्रात लिहिले की, विधानसभा सदस्य नवाब मलिक यांच्याबाबत आपण व्यक्त केलेल्या तीव्र भावना वाचून आनंद झाला. नवाब मलिक यांचे देशद्रोह्यांशी संबंध असल्याने त्यांना अजित पवार यांच्या सत्ताधारी बाकावर बसण्यास आपण विरोध केला. आपण नैतिकता व राष्ट्रवाद याबाबत किती पक्के आहात हेच यातून दिसले.
पण, अजित पवार गटाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे अलीकडेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. गोंदिया विमानतळावर मधल्या काळात पटेलांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. याच पटेल यांचे दाऊद व त्याच्या हस्तकांशी संबंध आहेत व दाऊदच्या खास हस्तकाकडून पटेल यांनी आर्थिक व्यवहार केल्याने ‘ईडी’ने पटेल यांची संपत्ती जप्त केली आहे. नवाब मलिक यांच्याबाबत आपल्या ज्या तीव्र भावना आहेत. तशाच भावना प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत आहेत काय? याचा खुलासा आपल्याकडून होणे गरजेचे आहे. तरी याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी आशा बाळगतो, असा मजकुर दानवे यांच्या पत्रात आहे.