नगर – हिंद सेवा मंडळाच्या नगर येथील सारडा वसतिगृहाच्या नूतनीकृत विस्तारित इमारतीचे उदघाटन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. तसे निमंत्रण नुकतेच नागपूर येथे हिंद सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना दिले आहे,त्यावेळी गडकरी यांनी निमंत्रण स्विकारले असून कार्यक्रमास येण्याबद्दल संमती दिली आहे, अशी माहिती मानद सचिव संजय जोशी यांनी दिली.
रामकरण सारडा वसतिगृहाचे सध्या शतक महोत्सवी वर्ष सुरू आहे आणि त्याचेच औचित्य साधून बांधण्यात आलेल्या वसतिगृहाच्या नूतनीकृत इमारतीचा उद्घाटन सोहळा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होण्यासाठी त्यांना निमंत्रण देण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथे मंत्री गडकरी यांनी भेट घेतली.
मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक म्हणाले, हिंद सेवा मंडळाचा नगर जिल्ह्यात मोठा विस्तार असून नगर शहर, मिरजगाव, श्रीरामपूर व अकोले येथे शैक्षणिक संस्था आहेत. संस्थेत बालवाडी पासून महाविद्यालयीन शिक्षण दिले जाते. या उच्च शिक्षणाबरोबरच नगर येथिल रामकरण सारडा वसतिगृहाला नुकतीच शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत.