मुंबई – नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी असल्याची टीका शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केली होती. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी गुलाबराव यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
नितेश राणे म्हणाले कि, ज्यांच्या नावातच गुलाब आहे. त्यांनी धंद्याबद्दल बोलू नये. अशा माणसाबद्दल काय टीका करणार? तुमची उंची किती, नारायण राणेंची उंची किती हे पाहा. टीका करायला ते दिवसातून किती तास शुद्धीत असतात. तसेच हे शुद्धीतच कधी असतात याची आता माहिती घेऊन नंतरच बोलू, अशी खरमरीत टीका त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर केली आहे.
दरम्यान, पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे. बोलण्यात काय बदल करतील हे सांगू शकत नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी केली होती. यावर गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. आता त्यांना काहीही कामधंदा उरलेला नाही. ते घरी काही बोलतात, बाहेर काही वेगळेच बोलतात. शेवटी त्यांना अशी विधाने करुन स्वतःचा टीआरपी म्हणजेच प्रसिद्धी मिळवायची असते, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंवर केली होती.