कणकवली – जिल्हा निवडणुकीच्या वादातून शिवसैनिक संतोष परब यांच्यावर केलेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला. त्यामुळे त्याचा निकाल गुरूवारी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्या गुरुवारी वेळ मिळाल्यावर या सुनावणीवर निर्णय घेतला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. हल्ला झालेले संतोष परब न्यायालयातून बाहेर पडताना माध्यमांसमोर आले, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला.
परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांना अटक वॉरंट निघाले आहे. धीरज जाधव,ज्ञानेश्वर माऊली आणि सचिन सातपुते हे तिघे या प्रकरणात आरोपी आहेत. या तिघांचा नितेश राणे आणि सचिन सावंत यांच्याशी संबंध आहे. या आरोपींचा नितेश राणेंशी संबंध असल्याचे तांत्रिक पुरावे असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. सत्तेत असणारेच जर मोर्चा काढून पोलिसांवर दबाव टाकतंय, असे नितेश राणे यांच्या वकिलांनी सांगितले.
नारायण राणे यांना पोलिसांची नोटीस
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी भाजपा आमदार नितेश राणे यांच्या विरोधातील प्रकरणात नोटीस बजावली आहे. त्यांना 3 वाजेपर्यंत हजर राहण्यास सांगण्यात आले. मात्र, 3 वाजून गेल्यानंतरही राणे हजर झालेले नाही. त्यामुळे सिंधुदुर्गमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही शिवसैनिकांनी नारायण राणेंना नितेश राणेंचा पत्ता माहिती आहे असं म्हणत पोलिसांकडे त्यांच्या चौकशीची मागणी केली.
शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले, कणकवलीचे शिवसेना उप जिल्हाप्रमुख सचिन सावंत आणि युवासेनेचे उप जिल्हा संघटक राजू राठोड यांनी कणकवली पोलीस स्टेशनला लेखी तक्रार केली आहे. यात नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहे हे सांगायला मी मूर्ख आहे का असे उद्गार काढले. यातून नितेश राणे कुठे आहेत हे नारायण राणे यांना 100 टक्के माहिती आहे. केंद्रातील मंत्री गुन्हेगाराला पाठिशी घालत आहेत,
लपवून ठेवत आहेत. म्हणून पोलिसांनी राणेंची चौकशी करावी आणि नितेश राणे कुठे आहेत याची माहिती घ्यावी. तसेच आरोपीला पकडावे अशी मागणी करण्यात आली आहे.