लाहोर – काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील सियालकोटमध्ये श्रीलंकेच्या नागरिकाची जमावाकडून अमानुष हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणातील 85 प्रमुख संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. कट्टर इस्लामी पार्टी असलेल्या तेहरिक ए तालिबान ए पाकिस्तानच्या सुमारे 800 जणांनी 3 डिसेंबरला सियालकोटमधील कपड्यांच्या पॅक्टरीवर हल्ला केला होता.
यादरम्यान या फॅक्टरीतील जनरल मॅनेजर प्रियांथा कुमारा दियावर्दना यांना अमानुष मारहाण करण्यात आली. दियावर्दना यांचा या मारहाणीमध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर दियावर्दना यांचा मृतदेह पेटवून देण्यात आला होता. इशनिंदेच्या आरोपावरुन ही हत्या करण्यात आली होती.
या घटनेच्या व्हिडीओच्या आधारे आतापर्यंत 85 संशयितांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांची कसून चौकशी केली जात आहे, असे पंजाब प्रांतातील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणी आणखीन 100 जण संशयित आहेत. मात्र या प्रकरणात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा कोणताच पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे एफआयआरमध्ये त्यांच्या नावाचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यापैकी काहीजणांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र प्राथमिक चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले असेही पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करावा आणि तपासाचा अहवाल न्यायालयात सादर करावा म्हणजे खटल्याला लवकरात लवकर सुरुवात करता येऊ शकेल, अशी सूचना लाहोर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आमिर भट्टी .ांनी सियालकोट जिल्हा पोलिसांना दिल्या आहेत.
दरम्यान या प्रकरणातील संशयितांच्यावतीने कोणीही वकील न्यायालयात उभा राहणार नाही, असे सियालकोट जिल्हा बार असोसिएशनने यापूर्वीच जाहीर केले आहे.