Sudhakar Badgujar : नाशिकचे शिवसेना ठाकरे गटाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत एका पार्टीत डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते चर्चेत आले होते. यावरून त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली होती. त्यानंतर आता बडगुजर यांच्या विरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर बडगुजर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सुधाकर बडगुजर म्हणाले की, “आठ वर्षानंतर गैरकृत्य केल्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे. तिथे असणाऱ्या इतर पक्षाच्या लोकांवर देखील गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. मी फक्त तिथे 5 मिनिट होतो. त्यामुळे तिथे असणाऱ्या बाकी लोकांवर देखील कारवाई झाली पाहिजे. खासदार हेमंत गोडसेंचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर काही कारवाई करण्यात आली नाही.”
पुढे ते म्हणाले, “विरोधकांना दाबण्याचा हा निंदनीय प्रयत्न असून गुन्हा दाखल झाला असेल तर न्यायालयात जाईल. आम्ही केले ते पाप त्यांनी केले ते पुण्य असे सरकार वागत आहे. पण 8 वर्षांपूर्वीच्या घटनेत हा गुन्हा दाखल झाल्याचे दुःख वाटते,” असे बडगुजर यांनी म्हटले आहे.
नितेश राणे यांनी केला होता आरोप
भाजप नेते नितेश राणे यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा गंभीर आरोप मागील हिवाळी अधिवेशनात केला होता. नितेश राणे यांनी विधानसभेत या पार्टीचे फोटो दाखवून यावर कारवाईची मागणी केली. दरम्यान, नितेश राणे यांनी केलेल्या मागणीची दखल घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले. सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करत असातनाचा फोटो नितेश राणेंनी सभागृहात दाखवला होता.
1993 चा बॉम्ब ब्लास्ट हा देशाला हादरवणारा होता. यातील आरोपी सलिम कुत्ता हा पॅरोलवर असताना तो पार्टी करतो. उद्धव ठाकरे गटाचा नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सोबत पार्टी करतो, हे गंभीर आहे. याला कोणाचा पाठींबा आहे? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला होता. दरम्यान, सलीम कुत्ता हा मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातला प्रमुख आरोपी आहे, तो पॅरोलवर असताना बडगुजर यांनी ही पार्टी केली, असा आरोप नितेश राणेंनी केला होता.