नऊ हजार बांधकाम कामगारांना मिळतेय पाच रुपयांत जेवण

80 बांधकाम प्रकल्पावर राबविली जातेय योजना

पिंपरी – बांधकाम मजुरांसाठी सुरू केलेल्या मध्यान्ह भोजन योजनच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरातील 80 बांधकाम साइट्‌सवरील नऊ हजार मजुरांना दरदिवशी एक वेळच्या सकस आहाराचा पुरवठा केला जात आहे. बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून ही योजना राबविली जात असून अवघ्या पाच रुपयांमध्ये मजुरांना भोजन उपलब्ध करून दिले जाते.पुण्यातील 153 बांधकाम स्थळांवरील 14,287 मजुरांना याचा लाभ मिळत आहे. मंडळाकडील नोंदणीकृत बांधकाम मजुरांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना काहीशी थंडावली होती. मात्र, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सात हजार कोटींच्या ठेवी पडून असतानादेखील, या घटकाला वाऱ्यावर सोडल्याने, या मजुरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने ही योजना पुन्हा सुरु करण्यात आली. सध्या राज्यातील मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुणे या चार शहरांतील नोंदणीकृत बांधकाम मजुरांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.

सद्य:स्थितीत एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेल्या बांधकाम प्रकल्पातील मजुरांनाच या योजनेच्या माध्यमातून अन्नाचा पुरवठा होत आहे. प्रकल्पातील बांधकाम सुरू असलेल्या जागेच्या जवळच या मजुरांनी राहण्याठी निवारे उभारले आहेत. पत्रा अथवा ताडपत्रीच्या साहाय्याने झोपड्या थाटून दाटीवाटीने हे मजूर त्यात राहतात. त्याच ठिकाणी काही मजूर स्वत:च्या हाताने अन्न शिजवितात. अत्यल्प उत्पन्नामुळे बऱ्यादा या मजुरांना कामाच्या प्रमाणात पोषण आहार उपलब्ध होत नाही. तसेच कामाच्या स्वरूपामुळे दुपारी अन्न शिजविणे कठीण जाते. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून मजुरांना अल्प दरात सकस आहाराचा पुरवठा होत आहे.

सध्या चार शहरांतील निवडक निर्माण प्रकल्पांत ही योजना राबविली जात असली तरी योजनेचा विस्तार इतर जिल्ह्यांत करण्याच्या दृष्टीने मंडळाकडून विचार सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या योजनेला बांधकाम कामगारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लॉकडाऊननंतर सध्या शहरात मोशी, चिखली, रावेत, पिंपळे सौदागर, गुरव, देहूरोड या परिसरात एकूण 80 बांधकाम साईटस्‌चे काम सुरु आहे. याठिकाणी असलेल्या कामगारांना या साईटस्‌वर हे भोजन उपलब्ध करून दिले जात आहे. या दुर्लक्षित घटकाला या योजनेचा मोठा आधार मिळाला आहे.
– जयंत शिंदे, अध्यक्ष, बांधकाम कामगार सेना 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.