सातारा – साताऱ्यातील पर्यावरणप्रेमींनी विरोध केल्याने सातारा वन विभागाची बहुचर्चित “नाइट जंगल सफारी’ वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. हा विरोध डावलून वन विभाग आणि कास संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्यावतीने ही नाइट सफारी सुरू करण्यात आली आहे. उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या हस्ते नाइट सफारीचा शुभारंभ करण्यात आला.
या नाइट जंगल सफारीसाठी दोन जीप व पाच सायकली सुशोभित करण्यात आल्या आहेत. यावेळी जावळी वनपरिक्षेत्र अधिकारी रंजन परदेशी, कास संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती चिकणे, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते, महादेव मोहिते म्हणाले, या नाइट जंगल सफारीमुळे स्थानिकांना रोजगार मिळेल. या सशुल्क मोहिमेतून व्यवस्थापन समिती आणि वन विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये वाढ करण्यात येईल. या सफारीत प्रवाशांना वन्यप्राणी जीवनाचा आनंद घेता येईल.
सध्या नाइट जंगल सफारीत एका फेरीसाठी आठ जणांसाठी चार हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. नाइट सफारीसाठी वापरण्यात येणाऱ्या जीप कास-बामणोली मार्गे अंधारी येथून जुंगटी येथील वॉच टॉवरपर्यंत जाणार आहेत. ही सफारी सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत होईल.
मारुती चिकणे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले की, वन विभागाच्या गस्ती पथकाच्या जीपचे रूपांतर नाइट सफारीच्या गाडीत करण्यात आले आहे. ही जीप रस्ता सोडून कुठेही जंगलात जाणार नसल्याने पर्यावरणाला धोका होण्याचा प्रश्नच येत नाही.दरम्यान, पर्यावरणवाद्यांनी या नाइट सफारीला कडाडून विरोध केला आहे. साताऱ्यातील उद्योजक राजेंद्र चोरगे, सामाजिक कार्यकर्ते अमित शिंदे आदींनी थेट महादेव मोहिते यांच्याकडे विरोध नोंदवला. चोरगे यांनी वन विभागाला पत्र देऊन नाइट सफारी पर्यावरणासाठी धोकादायक असल्याचे मुद्दे मांडले आहेत. सवयभान चळवळीचे अध्यक्ष वसंत जोशी यांनी ही निवेदन दिले आहे.
पर्यावरण संतुलनासाठी स्थानिकांवर निर्बंध घालायचे आणि पर्यटकांचे चोचले पुरवायचे, हे अशास्त्रीय आहे. वन्यप्राण्यांचे जीवनचक्र या नाइट सफारीमुळे उद्ध्वस्त होणार आहे. जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील पर्यावरण व अन्नसाखळी नाइट सफारीमुळे उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. त्यामुळे हा उपक्रम राबवू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.