वाघोली- हवेली तालुका पुणे शहराचा उपनगर विभाग म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात सध्या लोकसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. वाढत्या शहरीकरणाचा प्रभाव येथे अनेक व्यवसायावर दिसून येत आहे. त्यातच काही कायदेशीर मान्यता प्राप्त असणारे व्यवसाय तर काही बेकायदा व्यवसाय मोठ्या प्रमाणात उभे राहिले आहेत. लोणीकंद पोलीस ठाणे व लोणी काळभोर पोलीस ठाणे यांच्या अंतर्गत गावांमध्ये अनेक लहान – मोठी हॉटेल, ढाबे, यांची संख्या वाढू लागली आहे. लोणीकंद पोलीस ठाणे लोणी काळभोर पोलीस ठाण्यांमध्ये वर्णी लागावी म्हणून अनेकजण प्रयत्न करतात.
याच भागात अवैध धंद्यामधून मिळणारी मलई देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पुणे शहरालगतच्या भागांमध्ये अवैध धंद्यांना ऊत आला आहे. यात मटका, जुगार पत्त्यांचे क्लब, देशी- विदेशी दारू विक्री, हुक्का, गांजा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मान्यताप्राप्त हॉटेलमध्ये अथवा एका प्रशस्त जागेत व्यवसाय दिमाखदार पद्धतीने उभे आहेत. पहाटे चार वाजेपर्यंत हॉटेल उघडी ठेवून दारूविक्री हुक्का पार्लर चालवणे, हातभट्टयामध्ये तयार होणारी दारू विक्री, रात्रीतच विविध दुकानांना गुटख्याचा पुरवठा आदी उद्योग बिनभोबाटपणे सुरू आहे. घराच्या अथवा भाडेकरूची माहिती न देणाऱ्या घरमालकांवर पोलिसांकडून तातडीने कडक कारवाई करण्यात येते. मात्र, बेकायदा व्यवसायासाठी जागा भाड्याने देणाऱ्यांवर कारवाई होणार कधी, असा सवाल नागरिकांकडून उमटत आहे.
अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी सुरू केलेल्या बेकायदा व्यवसायावर रात्री-अपरात्री कारवाई का होत नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रात्री गस्त घालताना विचारपूस करणारी पोलीस यंत्रणा दिमाखदार पद्धतीने चालू असलेल्या अवैध धंद्याकडे कानाडोळा करीत आहे. चोरी, दरोडे यांच्यातील आरोपी सापडू शकतात. तरी हॉटेलमधील आरोपी का सापडू शकत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अवैध धंदे चालकांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलण्याची गरज आहे.