तहसीलदार सुनील कोळी यांचे तलाठी, मंडलाधिकाऱ्यांना आदेश
थेऊर- हवेली तालुक्याच्या पूर्व भागांमधील शासकीय ओढ्या, नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्याचे काम अद्यापही सुरूच आहे. अतिवृष्टीने बाधित असलेल्या शेतीचेही पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महसूल व कृषी विभागाने दिली आहे. हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी आठवड्यापूर्वी अतिक्रमण झालेल्या ओढ्या नाल्यांची पाहणी करून तलाठी व मंडलाधिकारी यांना संबधित अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
शेतकऱ्यांनी व प्लॉटिंग डेव्हलपर्सधारकांनी शासकीय ओढ्यांवर अतिक्रमण केल्याने हवेलीतील पूर्व भागांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मानवी वस्तीलाही अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला आहे. याची नुकतीच तहसीलदार व हवेली पंचायत समितीचे सभापती व सदस्या यांनी पाहणी केली होती. महसुलीदृष्टीने मोठे क्षेत्रफळ असलेल्या गावांमधील नुकसानीचे पंचनामे अद्यापही सुरूच असल्याची माहिती मंडलाधिकारी वर्षा तेलंग, दीपक चव्हाण, व्यंकटेश चिरूमुल्ला, किशोर शिंगोटे यांनी दिली.
कोलवडी, केसनंद, मांजरी खुर्द, थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, नायगाव, पेठ, सोरतापवाडी या भागातील सरकारी ओढ्यांना अतिक्रमणाचा विळखा बसल्याने ओढे, नाल्यांचे श्वास गुदमरला आहे. या भागातील गुंठेवारीमध्ये एका गुंठ्याला साधारणपणे सात ते आठ लाख रुपये भाव मिळत असल्याने हवेलीतील डेव्हलपर्सची वक्रदृष्टी शासकीय ओढे, नाले व कॅनालचे पाट यावर पडल्याने मोठ्या पूरपरिस्थितीचा फटका हवेलीतील शेतकऱ्यांना बसला आहे. गाव नकाशातील जुने ओढे, नाले पूर्ववत करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
- हवेलीतील सर्व तलाठी व मंडलाधिकारी यांची नुकतीच आढावा बैठक आयोजित केली होती. यामध्ये संगणकीय कामाचा संपूर्ण आढावा घेतला आहे. त्याचप्रमाणे अतिवृष्टीने बाधित असलेल्या शेतीचेही पंचनामे सर्व शेतकऱ्यांचे करण्याकामी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. याकामी तलाठी व मंडलाधिकारी यांनी आपल्या सजा भागात थांबून काम करण्याचे निर्देश देण्यात आलेले आलेले आहेत.
– सचिन बारवकर, महसूल अधिकारी, उपविभागीय कार्यालय, हवेली.