पुणे – लॉकडाऊन काळात पुणे शहरात वृत्तपत्र वितरणावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. मात्र, ही सेवा पुन्हा सुरू करण्यास पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार पुणे शहरातील कंटेन्मेंट झोन वगळून ही सेवा सुरू होण्याचा आणि घरोघरी वृत्तपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, “सकाळी 7 ते 10 या वेळेत वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण होईल. वर्तमानपत्राचे वितरण करणाऱ्या व्यक्तीने मास्क, हॅन्ड सॅनिटायझर बाळगणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे. सोबतच काही सहकारी सोसायट्यांमध्ये घरोघरी जाऊन वर्तमानपत्रांच्या वितरणास परवानगी दिली नाही, तर सोसायटीच्या कार्यालयापर्यंत वर्तमानपत्रांचे वितरण करण्यात येईल.’
दरम्यान, लॉकडाऊन काळात वृत्तपत्रांनी आपले अंक “ऑनलाइन’ आणि “पीडीएफ’द्वारे उपलब्ध करून दिल्याने वाचकांना घरबसल्या विश्वसनीय बातम्या उपलब्ध होत होत्या. त्यात आता वृत्तपत्र घरपोच येणार असल्याने वाचकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण ही अत्यावश्यक सेवा असल्याने त्याला मान्यता देण्यात आली आहे.