Tokyo Olympics : अखेर महिला हॉकी संघाला विजय गवसला

आयर्लंडवर 1-0 अशी मात, आव्हान कायम

टोकियो – सातत्याने पराभवांचा सामना करत असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान अखेर कायम राखले. अ गटातील लढतीत भारताने आयर्लंडचा सामना संपण्यास केवळ काही मिनिटे शिल्लक असताना गोल नोंदवत 1-0 असा पराभव केला व अंतिम 8 संघातील स्थान निश्‍चित केले.

सामना सुरू झाल्यावर दोन्ही संघांनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आले नाही. भारताला मिळालेल्या एकाही पेनल्टी कॉर्नरचा लाभ उठवता आला नाही. पहिल्याच हाफमध्ये भारताला तब्बल 10 पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. मात्र, त्यात एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या हाफमध्ये भारतीय संघाने संपूर्ण वर्चस्व राखत आक्रमण वाढवले. भारताने केलेले तब्बल 17 प्रयत्न अपयशी ठरले, तर एकूण सामन्यात मिळालेल्या 14 पेनल्टी कॉर्नरचाही फायदा घेता आला नाही. अखेर सामना संपण्यास केवळ तीन मिनिटे बाकी असताना नवनीत कौरने आयर्लंडचा बचाव भेदला व विजयी गोल केला.

या स्पर्धेत यापूर्वीचे सर्व सामने गमावलेल्या भारताच्या महिला हॉकी संघाला स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे अनिवार्य बनले होते. जर संघाने सामना जिंकला नसता किंवा बरोबरीत राखला असता तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असते. भारतीय महिला संघाचा टोकियो ऑलिम्पिकमधील हा पहिलाच विजय ठरला. विश्‍वकरंडक स्पर्धेतील उपविजेत्या आयर्लंडविरुद्ध भारताने मिळवलेला हा विजय संघाला पदकाच्या शर्यतीत कायम ठेवणारा ठरला आहे.

आता शनिवारी (31 जुलै) भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. जर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले आणि आयर्लंडचा संघ ग्रेट ब्रिटनकडून पराभूत झाला, तर भारतीय संघ उपांत्य फेरीत पात्र ठरेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.