Tokyo Olympics : पुरुष हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत

यजमान जपानवर मात करत भारताची विजयाची हॅट्ट्रिक

टोकियो – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने देदीप्यमान कामगिरी करताना स्पर्धेच्या उपांत्यपूर्वी फेरीत स्थान मिळवले. शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताने यजमान जपानचा 5-3 असा दणदणीत पराभव करत विजयाची हॅट्ट्रिकही साकार केली. भारताच्या संघाने जपानवर विजय मिळवताना पदकाची दावेदारी कायम राखली. भारताने या विजयासह गटामध्ये दुसरे स्थान मिळवले.

या सामन्यात सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी जपानवर अक्रमण केले. सामन्याच्या 13व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. या पेनल्टी कॉर्नरचे हरमनप्रीतने गोलमध्ये रूपांतर केले. या स्पर्धेत हरमनप्रीतचा हा चौथा गोल ठरला. त्यानंतर सामन्याच्या 17 व्या मिनिटाला सीमरनजित सिंगने दिलेल्या अफलातून पासवर गुरजंत सिंगने गोल करत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

यजमान जपानने त्यानंतर दोनच मिनिटांनी गोल केला. पहिल्या हाफमध्ये या सामन्यात 2-1 अशी स्थिती होती. दुसरा हाफ सुरू झाल्यावर मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकचे गोलमध्ये रूपांतर करत जपानने सामन्यात 2-2 अशी बरोबरी मिळवली. त्यानंतरच्याच मिनिटात भारताच्या समशेर सिंगने गोल केला आणि भारताला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली.

सामन्याच्या 51 व्या मिनिटाला भारताच्या नीलकांता शर्माने गोल करत संघाची आघाडी 4-2 अशी आणखी भक्‍कम केली. त्यानंतरही भारतीय संघाने आक्रमक खेळ कायम राखताना पाचवा गोल नोंदवला. गुरजंत सिंगनेच आपला दुसरा व संघाचा पाचवा गोल 56 व्या मिनिटाला नोंदवला व संघाला 5-2 अशी आघाडी मिळवून दिली.

सामन्याच्या 59 व्या मिनिटाला जपानने गोल करत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना पराभव टाळता आला नाही. भारताने हा सामना 5-3 असा दणदणीत फरकाने जिंकला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.