वाघोली (प्रतिनिधी) : दोन दिवसापूर्वी खाजगी लॅबच्या कोरोना रिपोर्टमध्ये पॉजिटीव्ह आलेल्या लोणीकंद येथील तरुणावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असतानाच याच तरुणाच्या संपर्कात आलेल्या ४७ जणांच्या खाजगी लॅब मध्ये केलेल्या कोरोना टेस्ट मध्ये दोघांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. ३५ वर्षीय व २२ वर्षीय दोघांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्याचे समजताच प्रशासनाची धावपळ सुरु झाली आहे.
दोघांनाही उपचारासाठी पुणे शहरामध्ये पाठविण्यात येत आहे. दोघांच्याही संपर्कात आलेल्याची माहिती गोळा करून कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. लोणीकंद परिसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी चालू असून कडेकोट बंद पाळण्यात येत आहे.
पहिला कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर हवेलीचे उपविभागीय अधिकारी यांनी लोणीकंद गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. याठिकाणी मेडिकल, आरओ प्लांट वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे त्याचबरोबर आगामी काळातही रुग्ण वाढण्याची चिन्हे दिसत असल्याने आवश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरातच राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.