पॉजिटीव्ह सापडलेल्या चौघांची प्रकृती स्थिर
वाघोली (प्रतिनिधी) : खाजगी लॅबमध्ये केलेल्या कोरोना टेस्ट रिपोर्टमध्ये वाघोलीतील चार जणांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्यानंतर वाघोली परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. चौथा पॉजिटीव्ह रुग्ण सापडल्यानंतर चार दिवसात एकही नवा कोरोनाचा रुग्ण वाघोलीत सापडला नाही. पॉजिटीव्ह सापडलेल्या चौघांची प्रकृती स्थिर असून क्वारंटाइन करण्यात आलेल्यांच्या हातावर शिक्के मारून आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.
वाघोली परिसरामध्ये खाजगी लॅबमध्ये केलेल्या कोरोना टेस्ट रिपोर्टमध्ये १५ एप्रिल रोजी पहिला रुग्ण पॉजिटीव्ह सापडला होता. याच अनुषंगाने केलेल्या २७ जणांच्या कोरोना टेस्ट रिपोर्टमध्ये १७ एप्रिल रोजी दोघेजण पॉजिटीव्ह आले होते. त्यानंतर १९ एप्रिल रोजी आणखी एकजण पॉजिटीव्ह आढळला. सद्यस्थितीत वाघोलीत एकूण ४ कोरोना रुग्ण आहे. चौघांमध्ये कोरोनाची लक्षणे प्रकर्षाने जाणवत नसून त्यांची प्रकृती स्थिर आहे. शेवटचा कोरोन रुग्ण सापडल्यानंतर चार दिवसात एकही नवा कोरोनाचा रुग्ण वाघोलीत सापडला नाही.
वाघोलीतील कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घरातच राहणे गरजेचे
वाघोलीत आत्तापर्यंत कोरोनाचे चार पॉजिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यांच्या कुटुंबांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी कोणत्याही क्षणी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढून अनेकांना विळख्यात घेऊ शकतो, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वाघोलीतील नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन घरीच राहणे गरजेचे आहे.