औषध फवारणीसाठी नगरपरिषदेने खरेदी केले फवारणी मशीन व टॅक्टर
शिरूर (प्रतिनिधी) : शिरूर नगर परिषदेच्या वतीने पालिका सफाई कर्मचारी यांच्यासाठी ‘क’ जीवनसत्त्वाच्या गोळ्या व उकडलेली अंडी देण्याचा उपक्रम सुरू केला असून त्यामुळे सफाई कामगारांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होणार आहे. कामगार तंदुरुस्त राहणार आहे. सफाई कामगार तंदुरुस्त तर शहरही तंदुरुस्त होण्यास मदत होणार असल्याचे शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले. शिरूर नगर परिषदेच्या वतीने सफाई कर्मचार्यांची काळजी घेत असल्याने कर्मचाऱ्यांचे चेहऱ्यावर आनंद, उत्साह निर्माण झाला आहे.
गेल्या सव्वा ते दीड महिन्यापासून शिरूर शहरात त्याबरोबर संपूर्ण राज्य आणि देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून संपूर्ण देश लॉक डाऊन आहे. परंतु या लॉक डाऊन च्या काळात शहरातील सफाई कामगार मात्र रोज शहराच्या सफाईत कुठेही खंड पडू देत नाही. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रोज शहर स्वच्छ करण्याचे काम ते करतात. या कामगारांसाठी त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शिरूर नगरपरिषदेच्या वतीने सर्व सफाई कर्मचाऱ्यांना रोज उकडलेली अंडी देण्याचा उपक्रम व त्याबरोबर क जीवनसत्त्वाच्या गोळ्या दिल्या जात आहे.
तर शिरूर नगर परिषदेच्या वतीने शिरूर शहरात जंतुनाशक फवारणी करण्यासाठी नवीन ट्रॅक्टर व फवारणी मशीनही आज घेण्यात आली. या फवारणी मशीनची उद्घाटन नगराध्यक्ष वैशाली वाखारे, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे, स्वच्छता सभापती विठ्ठल पवार, पाणीपुरवठा सभापती मुजफ्फर कुरेशी, माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे उपस्थित होते. 25 व 26 एप्रिल रोजी शिरूर शहर संपूर्णपणे लाॅकडाऊन असणार असून या काळात शिरूर शहरात जंतूनाशक औषध फवारणी करण्यात येणार असल्याचेही मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.
“शहरात मोठ्या प्रमाणात जंतुनाशक फवारणी करावी लागते त्यासाठी भाड्याची ट्रॅक्टर आणून शहरात फवारणी केली जात होती परंतु नगरपरिषद सभागृहनेते प्रकाशभाऊ धारीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेने स्वतःची फवारणी मशीन व नवीन ट्रॅक्टर घेण्यात आला आहे.” – विठ्ठल पवार, सभापती स्वच्छता व आरोग्य शिरुर नगर परिषद