शहरी भागांतील पत्रकारांना करोनाचा विळखा
जुन्नर (प्रतिनिधी) – करोना संदर्भातील अपडेट्स व माहिती राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचवणाऱ्या मुंबई शहरातील अनेक पत्रकारांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. राज्यात आरोग्य सेवा पुरवणारे डॉक्टर्स, नर्सेस तसेच कायदा सुव्यवस्था राखणारे पोलीस कर्मचारी यातील काहीजण करोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यात आता पत्रकारांची भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी व शिक्षकांना देण्यात आलेल्या करोना विमा संरक्षणाप्रमाणेच शासनाने पत्रकारांनाही विमाकवच द्यावे, अशी मागणी आंबेगाव तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संतोष वळसे पाटील यांनी केली आहे.
शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात करोना बाधितांची संख्या कमी असली तरी त्यात वाढ होत आहे. करोना संचारबंदीमध्ये दिवसभरात घडलेल्या विविध घडामोडी, शासकीय कामांची आकडेवारी व गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी पत्रकारांना विविध कार्यालयांत जावे लागते. नुकतेच शासनाने वर्तमानपत्राचा समावेश अत्यावश्यक सेवेत केला असून या करोनाविरुद्धच्या लढ्यात वर्तमानपत्रांची भूमिका महत्वाची असल्याचे वळसे यांनी सांगितले. दरम्यान याबाबत अधिकृत माहिती मुंबई महानगरपालिका किंवा सार्वजनिक आरोग्य खात्याकडून अद्याप आलेली नाही.