मावळ लोकसभा 2019 : राष्ट्रवादीची वाट आणखीनच बिकट

मावळातील विधानसभाही धोक्‍यात : महायुतीच्या मताधिक्‍क्‍यात वाढ

पिंपरी – लोकसभा निवडणूक होत नाही तोच आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मावळ लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदार संघनिहाय मिळालेली मते पाहता महायुतीचा मार्ग सुकर झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला कर्जत वगळता कुठेही आघाडी मिळालेली नाही. ती देखील अवघ्या 1850 मतांची असल्याने लोकसभेपाठोपाठ राष्ट्रवादीला विधानसभेला खडतर परीक्षेचा सामना करावा लागणार असल्याची चिन्हे आहेत.

विधानसभा इच्छुकांसाठी लोकसभेची निवडणूक “सेमी फायनल’ समजली जाते. आपापल्या भागातून कोणी किती लीड मिळवून दिला यावर उमेदवारीची आणि विजयाची गणिते अवलंबून असतात. मावळातील चित्र पाहता युती कायम राहिल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसची कर्जतमधील एकमेव जागा देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हातून निसटून जाण्याची भीती आहे. महापालिका निवडणुकीपाठोपाठ लोकसभेतील अपयशामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्थ पवार यांच्यात प्रतिष्ठेची लढाई झाली. सुरुवातीला अटीतटीची लढत दिसत असताना प्रत्यक्षात शिवसेनेसाठी हा निकाल एकतर्फी ठरला. तब्बल दोन लाखांच्या मताधिक्‍क्‍याने बारणे यांनी विजय मिळविला. त्यांच्या या मताधिक्‍क्‍यामुळे कर्जत वगळता उर्वरीत पाचही विधानसभा मतदार संघांमध्ये युतीची ताकद वाढली आहे. जगतापांशी मनोमिलन फायद्याने

विधानसभानिहाय उमेदवारांना मिळालेल्या मतांवर नजर टाकली असता एकमेव कर्जत मतदार संघात 1850 मतांची आघाडी पार्थ पवार यांना मिळाली. पिंपरी व चिंचवड हे एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हक्काचे मतदार संघ होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच रिमोट याठिकाणी चालायचा. मात्र, यावेळी या दोन मतदार संघांनी पार्थ यांचे समीकरण बिघडविले. चिंचवड विधानसभा मतदार संघातून बारणे यांना सर्वाधिक 1 लाख 76 हजार 475 एवढे मतदान झाले आहे. त्यांना तब्बल 96 हजार 758 एवढे मताधिक्‍य मिळाले आहे. तर पिंपरीतून 1 लाख 3 हजार 235 मते मिळाली आहेत. याठिकाणी 41 हजार 294 एवढे मताधिक्‍य मिळाले आहे. चिंचवडमध्ये भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी झालेले मनोमिलन बारणे यांच्यासाठी फायद्याचे ठरले.

पिंपरीत झाला घात

दुसरीकडे पिंपरी विधानसभेत झोपडपट्टीतील हक्काचा मतदार वळविण्यात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना अपयश आले. त्यातच वंचित बहुजन आघाडीला येथून 17 हजार 794 मते मिळाली. पिंपरीतून चुकीच्या नेत्यांवर विसंबून राहिल्याची मोठी किंमत पार्थ पवार यांना मोजावी लागली आहे. याठिकाणी कॉंग्रेसचे अस्तित्व असून नसल्यासारखे असल्यामुळे त्याचाही फटका बसला.

मावळात भेगडे निश्‍चिंत

मावळ हा भाजपचाच बालेकिल्ला आहे. याठिकाणी बारणे यांना 1 लाख 5 हजार 272 मते मिळाली आहेत. तर पार्थ यांना 83 हजार 445 मते मिळाली आहेत. 21 हजार 827 एवढे मताधिक्‍य येथून बारणेंना मिळाले. त्यामुळे स्थानिक आमदार बाळा भेगडे हे निश्‍चिंत झाले आहेत. तर मावळातील विधानसभा इच्छुकांच्या पोटात गोळा
आला आहे.

बारणे करणार का परतफेड?

मावळात भाजपचे तीन व शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे एकमेव आमदार आहे. पनवेल आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका भाजपच्या ताब्यात आहेत. शिवाय इतर काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे प्राबल्य आहे. शिवसेना उमेदवाराचा विजय म्हणजे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी टाकलेले एक पाऊल असे समजून भाजपने युती धर्म निभावत स्वतःला प्रचारात झोकून दिले. त्याचे फलित बारणे यांना प्रचंड मताधिक्‍यातून मिळाले. त्याची परतफेड बारणे कशी करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

‘शेकाप’ला उतरती कळा

गेल्या वेळी मावळ लोकसभा मतदारसंघात शेकापने निवडणूक लढविली होती. शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे लक्ष्मण जगताप सध्या भाजपचे आमदार आहेत. वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकांमध्ये पराभव पदरी येत असल्यामुळे यंदा शेकापने लोकसभेला स्वतःचा उमेदवार उभा न करता राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. घाटाखाली विशेषत: पनवेल, उरणमध्ये राष्ट्रवादीची मदार होती. मात्र, शेकापचेच अस्तित्त्व असताना त्यांच्यावर पुर्णतः विसंबून राहण्याचे धोरण राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी तोट्‌याचे ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)