नवी दिल्ली – सहकारी क्षेत्रातील संस्था असलेल्या एनसीसीएफने नेपाळमधून पाच टन टॉमेटो आयात केले असून ते गुरुवारी उत्तर प्रदेशमध्ये 50 रुपये किलो दराने वितरीत केले जाणार आहेत. एनसीसीएफ म्हणजेच नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने नेपाळमधून 10 टन टोमॅटो आयात करण्याचा करार केला आहे.
देशात सध्या टोमॅटोचे दर चांगलेच वाढले असून त्यामुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ही उपाययोजना करण्यात येत आहे. टोमॅटो हे नाशवंत पिक असल्याने ते नेपाळच्या जवळच्याच भारतीय हद्दीत वितरीत करावे लागते, ते देशाच्या अन्य भागात पोहचवणे अवघड आहे असे या संस्थेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. हे टोमॅटो आणि भारताच्या अन्य भागातून खरेदी करण्यात आलेले टोमॅटो उत्तरप्रदेशात निवडक ठिकाणी मोबाइल व्हॅन द्वारे विकले जाणार आहेत.
दिल्ली-एनसीआर आणि राजस्थानमध्ये, देशातील प्रमुख उत्पादक राज्यांमधून खरेदी केलेले टोमॅटो 50 रुपये प्रति किलो या अनुदानित दराने विकले जात आहेत. मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशातील नवीन टोमॅटो पिकाची आवक घाऊक मंडईत सुरू झाली असून त्यामुळे भावही कमी होत आहेत, असे या संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.
सरकारी आकडेवारीनुसार, टोमॅटोची अखिल भारतीय सरासरी घाऊक किंमत 15 ऑगस्ट रोजी 88.22 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आली, जी एका महिन्यापूर्वी 97.56 रुपये प्रति किलो होती. टोमॅटोची सरासरी किरकोळ किंमत एका महिन्यापूर्वी 118.7 रुपये प्रति किलो इतकी होते.