टोकियो – करोनाच्या धोक्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे गेली मात्र, त्याचा परिणाम म्हणून यजमान देश असलेल्या जपानची अर्थव्यवस्था जवळपास 5 वर्ष मागे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऑलिम्पिक एक वर्ष पुढे गेल्याने क्रीडापटू तसेच प्रेक्षकांना दिलासा मिळाला असला तरीही जपानने या स्पर्धेसाठी केलेल्या खर्चामुळे होणारे नुकसान कसे भरुन काढायचे तसेच देशात निर्माण होणारी बेरोजगारी तसेच अर्थव्यवस्था याचा सामना करावा असा प्रश्न आता जपानसमोर उभा राहिला आहे.
क्रीडा क्षेत्रातील सर्वात मानाची समजली जाणारी आणि मदर ऑफ ऑल स्पोर्टस अशी ख्याती असलेली ऑलिम्पिक स्पर्धा करोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, या स्पर्धेच्या तयारीवर करण्यात आलेला खर्च, स्वयंसेवकांचे मानधन, खेळाडूंच्या निवासासाठी आरक्षित करण्यात आलेल्या हॉटेल्सची बिले तसेच सामन्यांच्या आयोजनासाठी मैदानांचे क्रीडा संकुलांचे केलेले नूतणीकरण यांवर अफाट खर्च झालेला आहे. स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रिय ऑलिम्पिक संघटनेशी, खेळाडूंशी तसेच प्रसार माध्यमांशी करण्यात आलेले आर्थिक करार तसेच त्यात केलेली गुंतवणूक हा सर्व खर्च कसा भरून काढावा असा प्रश्न जपान सरकारसमोर निर्माण झाला आहे.
मूळ वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत होणार होती, ती आता एक वर्ष पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही स्पर्धा 2021 मध्ये जुलै महिन्यातच घेण्याचे संकेतही संघटनेने दिले आहेत.