मुंबई – आयएनएस विक्रांत घोटाळ्यात गोळा केलेले कोट्यवधी रुपये किरीट सोमय्या यांनी पीएमसी बॅंकेच्या माध्यमातून “व्हाइट’ केल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. देशभरात किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात गुन्हे केले जातील, असंही ते ईडीच्या कारवाईनंतर मुंबईमध्ये आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
राऊत म्हणाले की, हे आजचे शक्तिप्रदर्शन नाही तर लोकांच्या मनातली चीड आणि संताप आहे. आयएनएस विक्रांतचा घोटाळा झाला त्याच्या विरोधात आज शिवसैनिकांनी आंदोलन केलं. आज झालेले हे शक्तिप्रदर्शन नाही तर लोकांच्या भावना आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल आज गावपातळीवर चीड आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हल्ला करत आहे.
सोमय्यांच्या मुद्द्यावरून राज्यसभा स्थगित
संजय राऊत म्हणाले की, आयएनएस विक्रांतच्या निधीत राष्ट्रभक्तीच्या नावावर कोट्यवधी रुपये गोळा केले आणि पीएमसी बॅंकेच्या माध्यमातून किरीट सोमय्यानी ते व्हाइट केले. सोमय्यांच्या घोटाळ्यावर आज राज्यसभेचं कामकाज स्थगित झालं, भाजपचे खासदारसुद्धा यावर बोलू शकले नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातील.
तुम्ही तुमची कबर ही महाराष्ट्रात खोदली आहे, आता ही कबर देशातही खोदली जाईल, असं संजय राऊत भाजपला उद्देशून म्हणाले. सोमय्या त्यांच्या आरोपावर उत्तर देत नाहीत याचा अर्थ त्यांनी भ्रष्टाचार केल्याचं स्पष्ट आहे, असंही ते म्हणाले.
शिवसेनेचे मोठे शक्तिप्रदर्शन बुधवारी ईडीने कारवाई करत संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली होती. त्यानंतर संजय राऊत आज दिल्लीवरून मुंबईत आले. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. शिवसेनेने आज शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसत होते.