पुणे – रिझर्व्ह बँकेच्या जाचक अटींमुळे साधना बँकेची शेड्युल्ड बँक होण्यास विलंब होत आहे. सगळे नियम पाळून साधना बँक लवकरच शेड्युल्ड बँक होण्यासाठी बँक प्रयत्न करत आहे. याशिवाय बँकिंग क्षेत्रात जगात जे चालू आहे ते – ते ग्राहकांना सुविधा स्वरूपात साधना बँक देत आहे. बँकेने आधुनिकीकरण स्वीकारले असून तसा सेवाही वेळोवेळी सुरू केल्या आहेत. त्याचाच एक महत्त्वाचा टप्पा म्हणून आज साधना बँकेने ग्राहकांच्या सोयीसाठी यूपीआय सेवा सुरू केली आहे. बँकेचे हे काम कौतुकास्पद आहे, असे गौरोद्गार आमदार व साधना बँकेचे सुकाणू समितीचे सदस्य चेतन तुपे पाटील यांनी काढले.
हडपसर येथील साधना सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत यूपीआय सेवेचा शुभारंभ आमदार चेतन तुपे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व साधना बँकेचे सुकाणू समितीचे सदस्य दिलीपआबा तुपे, साधना बँकेचे चेअरमन अनिल तुपे, व्हाइस चेअरमन आबासाहेब कापरे तसेच बँकेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
बँकिंग क्षेत्राला सायबर धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यासाठी बँकांनी अद्ययावत तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे. असे सांगून अधिक मार्गदर्शन करताना आमदार चेतन तुपे म्हणाले की खऱ्या अर्थाने साधना बँक आता तुमच्या मुठीमध्ये आली आहे. यूपीआय सेवेमुळे कॅशलेश व्यवहार होण्यास मोठी मदत होणार आहे. साधना बँकेची प्रगती उत्तम आहे. बँकेच्या जडघडणीत पदाधिकारी, सभासद वर्गाबरोबरच कर्मचारी यांचे योगदान महत्वाचे आहे.
बँकेच्या मुख्यालयाचे काम पूर्णत्वास जात असून लवकरच या नवीन जागेत बँकेच्या मुख्य कार्यालय स्थलांतरित होइल त्यामुळे पुढील काळात बँकेची प्रगती आणखीन वाढेल असा विश्वासही आमदार तुपे यांनी व्यक्त केला.
कोरोना महामारी असो की बँकिंग स्पर्धा असो या स्पर्धेत आपण मागे नाही. आजवर बँकेने आधुनिक तंत्रज्ञान वापरून सेवा देत तरुण ग्राहक वाढेल याकडे लक्ष दिले आहे.त्यामुळे मागणी वाढली आहे. बँकेच्या वाढीसाठी यूपीआय सेवेचा हा टप्पा महत्त्वाचा असल्याचे चेअरमन अनिल तुपे यांनी सांगितले.
तर सुकाणू समितीचे सदस्य दिलीपआबा तुपे म्हणाले की सभासद, पदाधिकारी , कर्मचारी आणि ग्राहकांनी बँकेला वेगळ्या स्थानावर नेवून ठेवण्याचे काम केले आहे. कोरोना काळातही बँकेची वाटचाल चांगली सुरू आहे. स्पर्धेत टिकून आवश्यक त्या गोष्टी शिकण्यासाठी बँक नेहमीच पुढे राहील. आधिक चांगल्या पद्धतीने आणखी ग्राहकांना सुविधा देण्यात येतील.
यूपीआय सुविधेसाठी खातेदाराने आपल्या मोबाईल वरुन बँकेचे मोबाईल ॲप डाऊनलोड करावे, एटीएम कार्ड घेऊन एकच मोबाईल नंबर रजिस्टर करावा. त्यानंतर गुगल पे, फोन पे , पेटीएम यापैकी एक ॲप डाऊनलोड करून त्यावर साधना बँक खाते ॲड करून युपीआय पिन नंबर आणि पासवर्ड देऊन पुढे ऑनलाईन सर्व व्यवहार करता येतील, असे संगणक विभागाचे अधिकारी अनिल महाजन यांनी सांगितले.तर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चारूचंद्र सोहोनी यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभारही मानले.