नवी दिल्ली – करोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमतील उर्वरित सामने अमिरातीत होणार असले तरीही आता त्यातून अनेक परदेशी खेळडूंनी माघार घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
ही स्पर्धा टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधील 20 दिवसांच्या विंडोचा वापर केला जाणार. उर्वरित 31 लढती अमिरातीत होणार आहेत. यासंदर्भात बीसीसीआयने घोषणा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने माघार घेतली आहे. आता बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका या देशांच्या काही खेळाडूंनीदेखील माघार घेण्याचे सूतोवाच केले आहे.
बांगलादेश क्रिकेट मंडळाने या तीनही देशांच्या मंडळांसह आयपीएलच्या उर्वरित लढतींसाठी त्यांच्या खेळाडूंना ना हरकत प्रमाणपत्र देणार नसल्याचे सांगितले होते. आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू होत असतानाच बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यात 3 एकदिवसीय, तसेच 3 टी-20 सामन्यांची मालिका होणार असल्यानेच आयपीएलमधून माघार घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळानेदेखील आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामुळे त्यांचे खेळाडू आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होऊ शकत नाहीत असे म्हटले होते, तर ऑस्टेलियाच्या पॅट कमिन्सने माघार घेतल्यानंतर आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडूनही असेच संकेत देण्यात आले आहेत.