पुणे – मैत्रिणीला खुश करण्यासाठी घरफोड्या करणाऱ्या हरियाना देथील चोरट्याला चंदनगर पोलिसांनी अटक केली. तो हॉटेलमध्ये दिवसा शेफचे काम करतो आणि रात्री बंद असलेल्या ऑफिसेसवर डल्ला मारत होता. फुरकान नईम खान (वय 21, रा.पानिपत,हरियाना) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चार गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी चोरी केलेले भारतीय व परकीय चलन जप्त केले आहे.
खराडी येथील सिनॅप्स लॅब्स प्रा.लिमिटेड कंपनीच्या ऑफिसमध्ये दि.7 ऑगस्टला चोरी झाली होती. चोरट्याने तेथून तीन लाख सात हजार 492 रुपयांचे भारतीय व परकीय चलन चोरी केले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर पवन चव्हाण (वय 30) यांनी याबाबत चंदनगर पोलिसांत तक्रार दिली होती.
त्यानुसार अज्ञात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास करताना, तांत्रिक विश्लेषन आणि खबऱ्यारामार्फत सुभाष आव्हाड आणि विकास कदम यांना खान याच्याबद्दल माहिती मिळाली. त्यानेच ही घरफोडी केली असून सध्या तो पिंपरी-चिंचवड येथे असल्याचे समजले, त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच इतर चार ठिकाणी अशाच प्रकारे चोरी केल्याचे सांगितले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, मनिषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे, अरविंद कुमरे, कर्मचारी सचिन कुटे, अविनाश संकपाळ, सचिन रणदिवे, सुहास निगडे, महेश नाणेकर, विकास कदम यांच्या पथकाने केली.