औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील एका नर बिबट्याचा मृत्यू झाला आहे. “राजा’ असे या बिबट्याचे नाव असून, त्याचे वय 15 वर्षे होते. 16 ऑगस्ट रोजी रात्री तो मृत पावला आहे. मागील दोन महिन्यांपासून हा बिबट्या आजारी होता.
या बिबट्याला हेमलकसा गडचिरोली येथून 2016 मध्ये प्राणीसंग्रहालयात आणण्यात आले होते. त्यावेळेस त्याचे वय अंदाजे 7 ते 8 वर्षे इतके होते. त्याचा प्राणीसंग्रहालयामध्ये 7 वर्षे वावर होता.
मागील काही दिवसांपासून आजारी असलेल्या राजावर प्राणीसंग्रहालय पशुवैद्यक डॉ. निती सिंग यांचेमार्फत प्रतिदिनी उपचार करण्यात येत होते. या बिबट्याचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासले असता अहवालानुसार आजारी बिबट्यावर उपचार करण्यात येत होते. परंतु उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने बुधवारी मध्यरात्री राजाने अखेरचा श्वास घेतला.
या बिबट्याचे शवविच्छेदन डॉ. अमितकुमार दुबे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, डॉ. रोहीत धुमाळ, व डॉ. महेश पवार पशुधन विकास अधिकारी, शासकीय पशुसर्व चिकित्सालय यांनी केले.