नवी दिल्ली – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. यावर शरद पवार गटातर्फे निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आले असून अजित पवार गटाने केलेले सर्व दावे फेटाळले आहेत. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे म्हटले आहे.
अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या विरोधात सुद्धा अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. नऊ मंत्र्यांशिवाय 31 आमदारांच्या विरोधातही अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली असून यातील चार विधान परिषद आमदार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीत पक्षाची चिन्हाची लढाई सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाने अद्याप पक्षातील फुटीची केस म्हणून नोंद घेतलेली नाही. अजित पवारांनी 2 जुलैला बंड केल्यानंतर दोन महिन्यानंतर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला उत्तर दिले आहे. अजित पवार गटाला देखील आजच उत्तर दाखल करायचे आहे. मात्र अद्याप त्या संदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही.
शरद पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या उत्तरात अनेक महत्त्वाच्या बाबींची नोंद केली आहे. पहिल्यांदाच अपात्र आमदारांचा आकडा समोर येत आहे. नऊ मंत्र्यांविरोधात शरद पवार गटाने याचिका दाखल केलेली आहे.
मात्र या नऊ मंत्र्यांशिवाय 31 आमदारांच्या विरोधातही अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या शिवाय अजित पवार गटाने केलेले दावे देखील शरद पवार गटाने फेटाळले आहेत. 2022 मध्ये जी राष्ट्रीय कार्यकारणी झाली त्याचे देखील दाखले देण्यात आले आहे.
दरम्यान, आता निवडणूक आयोगातील लढाई ही गांभीर्याने सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने अद्याप पक्ष फुटीची केस म्हणून नोंद घेतलेली नाही. दोन्ही बाजूची उत्तर ऐकल्यानंतर आयोग कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.