सातारा – गुरुवारी रात्री झालेल्या किरकोळ वादाच्या कारणातून शुक्रवारी सायंकाळी दोघांनी एकाला काठीने मारहाण केली. त्या मारहाणीत जखमी झालेल्या भाऊसो पांडुरंग माने यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी संजय पांडुरंग माने, पांडुरंग देवबा माने ( दोघे रा. म्हासुर्णे, ता.खटाव) यांच्यावर संशय असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मयत भाऊसो व संशयित पांडुरंग हे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्यात गुरुवारी रात्री किरकोळ कारणावरून वाद झाला होता. दरम्यान मयत भाऊसो यांनी पांडुरंग यांना शिवीगाळ केली होती. त्याचा राग मनात धरून दोन्ही संशयितांनी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भाऊसो यांना काठीने मारहाण केली. या मारहाणीत भाऊसो हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.निलेश देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख, पोलिस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांच्यासह पोलीसांचा फौजफाटा म्हासुर्णे येथे दाखल झाला.