पुणे – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पाठिंबा दिला नसता तर मी भारतीय संघाकडून इतके सामने खेळूच शकलो नसतो. त्याने सातत्याने माझ्यावर विश्वास ठेवल्याने खरेतर माझी कारकीर्द घडली, अशा शब्दात महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधवने धोनीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
केदारला भारतीय संघाकडून 73 सामने खेळायला मिळाले. त्याला गेल्यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतही संघाकडून खेळता आले. त्यासाठी केदारने धोनीचे आभार मानले.
भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धची मालिका खेळून मायदेशी परतला व त्यानंतर दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या मालिकेसाठी मात्र केदारला संघात स्थान मिळाले नाही. मी कारकीर्दीत जितके सामने खेळलो त्याच्या केवळ 10 टक्केच सामने खेळू शकलो असतो. मात्र, त्यावेळी धोनीने माझ्या सहभागासाठी सातत्याने आग्रह धरला त्यामुळेच इतके सामने माझ्या नावावर जमा झाले. काही सामन्यात माझ्या धावा झाल्या नाहीत. पर्यायी गोलंदाज म्हणूनही काही वेळा अपयश आले पण धोनीनेच मला सांभाळून घेतले, असेही केदारने सांगितले.