नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीतील नव्या करोनाबाधितांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून लक्षणीय घट होत आहे. त्याचा आधार घेऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील करोनाची तिसरी लाट आटोक्यात येत असल्याचा दावा केला.
मागील महिन्यात दिल्लीत दरदिवशी करोनाबाधितांच्या संख्येत मोठी भर पडत होती. देशाच्या राजधानीत 11 नोव्हेंबरला तब्बल 8 हजार 593 नवे करोनाबाधित आढळले. तो दिल्लीतील आजवरचा एका दिवसातील उच्चांक ठरला. मात्र, मोठ्या संख्येने बाधित आढळण्याचे चित्र आता बदलले आहे. शनिवारी केवळ 1 हजार 133 नवे बाधित आढळले.
त्याचा संदर्भ देत केजरीवाल यांनी दिल्लीबाबत आशादायी चित्र मांडले. दिल्लीतील करोनाविषयक आकडेवारी खरी आहे. करोना संकटाची तीव्रता कमी दाखवण्यासाठी आकडेवारीत फेरफार करण्याचा सल्ला आम्हाला देण्यात आला.
मात्र, आकडेवारी खरी ठेवण्यासंदर्भात मी स्पष्ट आदेश दिले, असे त्यांनी म्हटले. मात्र, कुणाकडून तो सल्ला देण्यात आला ते उघड केले नाही. करोनावरील लस अजून उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे सर्वतोपरी दक्षता बाळगावी, असे आवाहनही केजरीवाल यांनी दिल्लीकरांना केले.