मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबईतील मेट्रोचे तसेच विविध विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी स्तुतीसुमने उधळली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने उधळली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभरात भक्त, चाहते आहेत. त्यांनी दावोसमधील घडलेला प्रसंग सांगितला. शिंदे म्हणाले, जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोसमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणीही मोंदीचीच हवा होती. अनेक देशाच्या पंतप्रधानांनी फक्त मोदींबद्दलच विचारले. दावोसमध्येही मोदींचे भक्त असल्याचे मला जाणवले. तसेच मोदींच्या नेतृत्वाखाली येत्या काळात मुंबईचा चेहरामोहरा बदलून टाकणार असल्याचा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी महाविकास आघाडीवर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास किती झाला ते आपल्याला माहिती आहे. अगदी ठप्प झालेल्या कामांना चालना देण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्याची संधी आम्हाला मिळाली ती केवळ नरेंद्र मोदींच्यामुळे. काही लोकांना वाटायचं की या कार्यक्रमाचे उद्धाटन मोदींच्या हातून होऊ नये, पण नियतीसमोर कुणाचे काही चालत नाही. मोदींच्या व्यक्तीमत्त्वामध्ये असे काही आहे की जे आपल्याला उर्जा देते. येत्या दोन अडीच वर्षामध्ये या मुंबईचा कायापालट आपल्याला पाहायला मिळेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.