अण्णांचा पुन्हा आंदोलनाचा एल्गार; केंद्रीय कृषीमंत्र्यांना पाठवलं पत्र

नगर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गतवर्षी शेतमालाला सी-टू प्लस फिफ्टी भाव, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता, आदी मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते.

अण्णांनी आंदोलन करू नये, म्हणून तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे अण्णांनी या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुन्हा आंदोलनाचा एल्गार केला असून, लवकरच आंदोलनाची तारीख आणि ठिकाण घोषित करू, असे पत्र केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पाठवले आहे.

तत्कालीन कृषिमंत्री राधामोहन सिंह, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुभाष भामरे, गिरीश महाजन आदींच्या उपस्थितीत अण्णांना या प्रश्नावर केंद्रीय समिती नेमून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. या समितीचे प्रमुख तत्कालीन केंद्रीय कृषी राज्य मंत्री सोमपाल शास्त्री, नीती आयोगाचे सदस्य रमेशचंद्र होते.

मात्र आता दोन वर्षे उलटली असली, तरी या समितीने या आश्वासनावर कोणताही मार्ग काढलेला नाही. म्हणून आता पुन्हा एकदा या प्रश्‍नावर आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे अण्णांनी पत्रात म्हटले आहे. आंदोलनाची दिशा, तारीख आणि वेळ लवकरच घोषित केली जाईल, असेही अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.