पाथर्डी : नगरपरिषदेमार्फत स्वच्छतेचा ठेका हा खासगी कंपनीला देण्यात आला असून, ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू आहे. गेली दहा वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगाराला बाजूला करून नव्या कामगारांना घेण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या सफाई कामगारांवर अन्याय केला आहे. अशा जुन्या कामगारांना कामावर घ्यावे,अन्यथा आता न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा नगरपरिषद कर्मचारी महासंघ संघटनेच्या वतीने देण्यात आला.
यावेळी नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र कसबे, सागर दिनकर, कचरू दिनकर, अनिकेत नन्नवरे, सचिन मोहिते, मच्छिंद्र कसबे, लक्ष्मण बालवे, अभिषेक दिनकर, राजू दिनकर ,पोपट शेकडे, प्रवीण आढागळे, सविता दिनकर, मंगल दिनकर, मंगल काकडे, यमुना दिनकर, अंजना पवार, रेखा दिनकर, मंदा दिनकर आदी महिला व पुरुष कंत्राटी सफाई कामगार उपोषणात सहभागी झाले आहेत.
स्वच्छता व घन कचरा व्यवस्थापनामध्ये नाममात्र एजन्सीद्वारे नगरपरिषदेचे काम सुमारे ५५ कामगार कंत्राटी पद्धतीने करीत आहे. या कामगारांना किमान वेतन, बोनस, भविष्य निर्वाह निधी, ई. एस. आय.ई. कामगार कायदे लागू आहेत. मात्र, कामगारांना कोणताही याचा लाभ मिळत नाही. या कायदयांची अंमलबजावणी करण्याबाबत मागणी पत्र व्यवहार पाथर्डी नगरपरिषद व सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून संघटनेने केला आहे. मात्र, ठेकेदार व संबंधित एजन्सी हे कायद्याचे पालन न करण्याच्या हेतूने आकसापोटी कामगारांना दडपण आणून कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली गेली.
संघटनांचे राजीनामे व मी कोणत्या संघटनेचा सभासद होणार नाही, अशा स्वरूपाचे लेखी पत्र कामगारांकडून ठेकेदारांनी लिहून घेतले आहे. असे लेखी न देणाऱ्या कामगारांना गेल्या चार महिन्यापासून अद्यापपर्यंत कामावर हजर करून घेतलेले नाही. कामगार पुरवठा एजन्सी मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवत आहे. या विरोधात संघटना म्हणून कामगार आवाज उठवण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा कामगारांना कामावरून काढून टाकण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. या सर्व सफाई कंत्राटी कामगारांना कामावर घेण्याची मागणी संघटनेमार्फत करण्यात आली असून, सोमवारपासून हे उपोषण पाथर्डी नगरपरिषदेसमोर सुरू करण्यात आले आहे. प्राथमिक मागण्यांबाबत आम्ही वेळोवेळी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला. आता कोणत्याच प्रकारे दाद मिळत नसल्याने न्यायालयाचा मार्ग अवलंबू, असे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.