पुदुच्चेरीचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री रंगास्वामींना कोरोनाची लागण; चेन्नईत उपचार सुरू, प्रकृती स्थिर

चेन्नई: देशभरात नुकत्याच पाच राज्यातील निवडणुका पार पडल्या. पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला जनतेने कौल दिला. त्यानंतर एन. रंगास्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, शपथ विधीनंतर केवळ ४८ तासांत म्हणजेच दोन दिवसात एन. रंगास्वामी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. रंगास्वामी यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुदुच्चेरीच्या आरोग्य विभागाच्या प्रवक्त्यांनी याविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार, मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयांत पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. आता रंगास्वामी यांची प्रकृती स्थिर आहे. पुदुच्चेरीमधील इंदिरा गांधी सरकारी मेडिकल कॉलेज येथे रंगास्वामी यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, असे सांगितले जात आहे.

एन. रंगास्वामी यांनी शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर आरोग्य विभागाकडून १८३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली. याशिवाय, पुदुच्चेरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, रविवारी एकाच दिवशी सर्वाधिक २६ जणांचा मृत्यू झाला. तर, १६३३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. पुदुच्चेरीत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या ७१ हजार ७०९ झाली आहे, अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात रविवारी दिवसभरात ३ लाख ६६ हजार १६१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख ५३ हजार ८१८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत ३ हजार ७५४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात ३७ लाख ४५ हजार २३७ रुग्ण उपचार घेत आहेत. देशात आतापर्यंत १७ कोटी ०१ लाख ७६ हजार ६०३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.