#CWC2019 : भारताचे आव्हान संपुष्टात; न्यूझीलंड अंतिम फेरीत

-जडेजा व धोनीची झुंज व्यर्थ
-रोहित, राहुल व कोहलीकडून निराशा

मॅंचेस्टर – शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठापूर्ण झालेल्या लढतीत रवींद्र जडेजा याने भारतास विजय मिळवून देण्यासाठी शर्थीची झुंज दिली. मात्र, त्याची ही झुंज संघास अंतिम फेरी गाठण्यासाठी अपुरीच पडली. न्यूझीलंडने हा सामना 18 धावांनी जिंकला व अंतिम फेरीत प्रवेश केला. विजयासाठी 240 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 49.3 षटकांत 221 धावांवर आटोपला. न्यूझीलंडने 50 षटकांत 8 बाद 239 धावा केल्या होत्या.

पावसाच्या व्यत्ययामुळे काल हा सामना स्थगित राहिला होता. त्यावेळी न्यूझीलंडच्या 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा झाल्या होत्या. त्यांनी बुधवारी डाव पुढे सुरू केला. त्यावेळी त्यांचे फलंदाज आणखी किती धावा जोडतात याचीच उत्सुकता होती. त्यांनी 50 व्या षटकापर्यंत खेळ करीत 8 बाद 239 धावांपर्यंत मजल गाठली. त्यांचा भरवशाचा फलंदाज रॉस टेलर याने कालच्या 67 धावांमध्ये आणखी 7 धावांची भर घातली. सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या रवींद्र जडेजाने थेट यष्टीवर चेंडू फेकून त्याला धावबाद केले. टेलरने 3 चौकार व एक षटकारासह 74 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्‍वरकुमारने तीन विकेट्‌स घेतल्या.

या स्पर्धेत भारतीय फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला होता. या पार्श्‍वभूमीवर 240 धावांचे लक्ष्य अवघड नव्हते. तथापि, पहिल्या फळीतील फलंदाजांनी निष्क्रीयतेने फटके मारत विकेट्‌स फेकल्या. भारताची मुख्य मदार पहिल्या फळीवरच आहे हे लक्षात घेऊन न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी यष्टीबाहेर मारा करण्याची रणनीती आखली. त्यांच्या या चालीत भारताचे पहिल्या फळीतील फलंदाज शिकार ठरले. रोहित शर्मा व लोकेश राहुल हे दोघेही मॅट हेन्‍रीच्या गोलंदाजीवर यष्टीमागे झेल देत बाद झाले तर कर्णधार विराट कोहली याला ट्रेंट बोल्टने पायचित केले. या तीनही फलंदाजांनी प्रत्येकी केवळ एक धाव काढली. भारताची घसरगुंडी एवढ्यावरच थांबली नाही. आक्रमक खेळासाठी ख्यातनाम असलेल्या दिनेश कार्तिकने पुन्हा निराशा केली. केवळ 6 धावांवर तो बाद झाला. त्यावेळी भारताची 4 बाद 24 अशी दयनीय स्थिती झाली होती. भारत तीन आकडी धावा करू शकणार की नाही अशी शंका निर्माण झाली होती.

साहजिकच भारतीय चाहत्यांमध्ये सन्नाटा निर्माण झाला होता. ऋषभ पंत व हार्दिक पांड्या यांनी जबाबदारीने खेळ करीत संघाचा डाव सावरला. त्यांनी 47 धावांची भागीदारी केली. पहिले चार बळी घेताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी दाखविलेला प्रभाव हळूहळू कमी झाला. त्यातच त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी केलेल्या चुकाही त्यांना फारशा महागात पडल्या नाहीत. मात्र, ही जोडी बाद झाल्यामुळे पुन्हा भारतीय संघ 6 बाद 92 असा अडचणीत सापडला. पंतने 4 चौकारांसह 32 धावा केल्या. पांड्यानेही तेवढ्याच धावा करताना 2 चौकार मारले. या दोघांच्या विकेट्‌स घेण्याचा आनंद न्यूझीलंडला फार वेळ घेता आला नाही. धोनी व जडेजा यांनी आश्‍वासक खेळ केला. पहिले सहा मोहरे तंबूत परतल्यानंतर भारताच्या आशा याच जोडीवर केंद्रित झाल्या होत्या. या जोडीने यापूर्वीही भारताला वाचविले होते. आपल्याला साखळी सामन्यांमध्ये दुर्लक्षित करण्यात आले याचाच प्रत्यय घडवित जडेजाने आक्रमक व आत्मविश्‍वासाने खेळ केला.

कॅप्टन कूल म्हणून ख्याती असलेल्या धोनीने त्याच्या या शिष्यास फटकेबाजी करण्याबाबत सतत प्रोत्साहन दिले. एका बाजूने विकेट टिकविण्यावरच त्याने समाधान मानले. त्यांनी जबाबदारीबरोबरच टोलेबाजी करीत चाहत्यांमधील निराशा दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी धावफलक सतत हालता ठेवत विजयाच्या आशा पल्लवित केल्या. एकवेळ अशक्‍य वाटणारा विजय त्यांनी समीप आणला होता. सतारीची मैफल रंगात असतानाच सतारीची तार तुटली जावी व मैफलीचा बेरंग व्हावा असेच काहीसे घडले.

उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात जडेजा बाद झाला. त्याने 59 चेडूंमध्ये 77 धावा करताना 4 चौकार व तेवढेच षटकार मारले. त्याने धोनीच्या साथीत 116 धावांची भागीदारी केली. पाठोपाठ धोनीही बाद झाल्यामुळे पुन्हा भारताच्या डावास खिंडार पडले. तेथेच भारताच्या विजयाच्या आशाही संपुष्टात आल्या. धोनीने 72 चेडूंमध्ये 52 धावा केल्या. मार्टिन गुप्टील याने थेट यष्टीवर चेंडू फेकून त्याला धावबाद केले. धोनी बाद झाल्यानंतर भारताचा उर्वरित डाव गुंडाळण्यास न्यूझीलंडला वेळ लागला नाही.

संक्षिप्त धावफलक –

न्यूझीलंड – 50 षटकांत 8 बाद 239 (रॉस टेलर 74, केन विल्यमसन 67, भुवनेश्‍वरकुमार 3-43) भारत – 49.3 षटकांत सर्वबाद 221 (रवींद्र जडेजा 77, महेंद्रसिंग धोनी 50, ऋषभ पंत 32, हार्दिक पांड्या 32, मॅट हेन्‍री 3-37, ट्रेंट बोल्ट 2-42, मिचेल सॅन्टेर 2-34)

Leave A Reply

Your email address will not be published.