Beed Lok Sabha Constituency – बीड लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बीड लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. असे झाल्यास महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तगडा प्रतिस्पर्धी उमेदवार मिळणार आहे.
वास्तविक, बीड लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून पंकजा मुंडे तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या दोघांमध्येच थेट लढत होणार असल्याचे मानले जात असतानाच आता ज्योती मेटे यांची एंट्री झाल्यास येथे तिरंगी लढत पहायला मिळू शकते.
पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे या दोघांचीही डोकेदुखी वाढेल –
याआधी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने ज्योती मेटे यांनी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, त्यांना उमेदवारी न देता बजरंग सोनवणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आता बीड लोकसभा मतदारसंघात ज्योती मेटे या वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे या दोघांचीही डोकेदुखी वाढेल? अशी शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाने डावलले –
ज्योती मिटे यांनी आपल्या सहकार विभागातील अतिरिक्त सहायक निबंधक पदाचा, सरकारी नोकरीचा राजीनामा देत शरद पवार गटाच्या वतीने बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. या संदर्भात ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. त्यानुसार आपण उमेदवारीसाठी आशावादी असल्याचे ज्योती मेटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.
मात्र, ज्योती मेटे यांना डावलत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या वतीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्योती मेटे काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्योती मेटे यांना संपर्क साधण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या विषयी कोणतीही माहिती देण्यास मात्र, ज्योती मेटे यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा ठरणार प्रभावी –
शिवसंग्राम संघटनेचे नेते स्व. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मोठ्या प्रमाणात काम केले होते. बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी केलेल्या आंदोलनाचा प्रभाव आजही दिसून येतो. त्यातच मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये रान पेटले होते. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षाच्या उमेदवारांना ज्योती मेटे यांच्या माध्यमातून तगडा प्रतिस्पर्धी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीडमध्ये मराठा उमेदवार म्हणून ज्योती मेटे या प्रभावी ठरू शकतात. त्यामुळे आता पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे या दोन्ही उमेदवारांना तगडी टक्कर मिळेल.