जोहान्सबर्ग – कोविड -19 विषाणूचा नवीन प्रकार सापडला असल्याचे दक्षिण आफ्रिकेने जाहीर केले आहे. या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव अधिक झपाट्याने होत असून त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णालयात दाखल केल्या जाणाऱ्या बाधितांची संख्या आणि मृत्यूदरही झपाट्याने वाढत असल्याचे अलिकडच्या काळातील निरीक्षणामध्ये आढळून आले आहे.
नवीन स्वरुपातील करोना विषाणूला “501.व्ही 2′ असे नाव देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या नव्याने आढळत असलेल्या संसर्गामध्ये या विषाणूमुळे होत असलेल्या संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे, असे वैद्यकीय तज्ञांनी म्हटले आहे.
या विषाणूच्या गुणधर्मांबाबत आणि त्याच्या वैशिष्ट्यांबाबत आताच काही ठोसपणे सांगितले जाऊ शकणार नाही. मात्र हा विषाणू करोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. त्यामुळे त्यापासून सावध राहणे अधिक गरजेचे आहे, असे सरकारच्या मंत्री सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रोफेसर सलीम अब्दुल करीम म्हणाले. दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्या लाटेपेक्षाही या नवीन विषाणूची लाट अधिक प्रमाणात वाढू शकते, असेही करीम यांनी सांगितले.
या नवीन प्रकारच्या विषाणूच्या प्रादुर्भावाचा वेग कल्पनेपेक्षाही अधिक वेगाने होत आहे. याबाबत सतर्कता वाढवणे हेच गरजेचे असून त्याबाबत संशोधन आणि वैद्यकीय उपचार पद्धती विकसित करण्यासाठी जो कालावधी लागू शकतो, तोपर्यंत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असे सल्लागार समितीचे सदस्य प्रा.इयान सन्ने यांनी सांगितले.