नागपूर – ब्रिटनमध्ये सापडलेल्या करोनाच्या नवा ‘स्ट्रेन’ धुमाकूळ घालत आहे. अशातच इंग्लडहून नागपुरात आलेला तरुण करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. या तरुणाच्या शरीरात नवीन स्ट्रेन असल्याचा अंदाज आहे. यामुळे भारताची चिंता वाढली आहे.
माहितीनुसार, संबंधित तरुण हा २९ नोव्हेंबर रोजी नागपुरात आला होता. भारतात उतरल्यानंतर विमानतळावर त्याची करोना चाचणी झाली होती. पण त्याचा अहवाल निगेटीव्ह आला होता. परंतु, काही दिवसांनंतर तरुणाला लक्षणे जाणवू लागल्यानंतर १५ डिसेंबरला त्याने पुन्हा चाचणी केली. ही चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.
बाधित तरुणावर उपचार सुरु असून त्याचे नमुने पुढील तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. २८ वर्षीय तरुण करोनाच्या नव्या स्ट्रेनचा रुग्ण असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन आता सतर्क झाले असून तरुणाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. इंग्लंडमधून आल्यानंतर हा तरुण नागपूरसह गोंदियात अनेकांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सध्या तरुणाला वास ओळखता न येण्याचे लक्षण दिसत असून त्याची प्रकृती ठीक आहे.