मुंबई : नाणार प्रकल्पात स्थानिकांचा विरोध मावळला तर महाविकास आघाडी सरकार पुढाकार घेईल, असे वक्तव्य शिवसेना आमदार राजन साळवी यांनी केले होते. मात्र काही वेळातच त्यांच्यावर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. त्यानंतर आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी साळवींना भाजपाकडून आमदारपदाची खुली ऑफर दिली.
त्यानंतर, साळवी यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाबाबत आमदार नितेश राणेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी थेट साळवींना खुली ऑफर दिली. “राजन साळवी नाणारच्या भूमिकेमुळे पक्षात एकटे पडणार असं दबक्या आवाजात बोललं जात आहे. नाणारवर घेतलेल्या भूमिकेवरुन राजन साळवी यांना जर शिवसेनेत त्रास होत असेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि भाजपात यावं. नाणार समर्थक आमदार म्हणून आम्ही त्यांना निवडून आणू”, अशी ऑफर नितेश राणेंनी साळवींना दिली.
शिवसेना आमदार राजन साळवी यांनी जैतापुर व नाणार प्रकल्पाला जर लोकांचे समर्थन असेल तर विचार करू असं बोलल्यानंतर मागून आलेल्या शिवसैनिकांनी त्यांना फटकारले. ही इज्जत एका निष्ठावंत शिवसैनिकाला आजच्या शिवसेनेमध्ये मिळते. ज्याच्याकडे गांधीजी तोच खरा शिवसैनिक हे आज शिवसेनेत चित्र आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 24, 2020
“शिवसेना आमदार राजन साळवी यांनी जैतापूर व नाणार प्रकल्पाला जर लोकांचे समर्थन असेल तर विचार करू असं बोलल्यानंतर मागून आलेल्या शिवसैनिकांनी त्यांना फटकारले. ही इज्जत एका निष्ठावंत शिवसैनिकाला आजच्या शिवसेनेमध्ये मिळते. ज्याच्याकडे गांधीजी तोच खरा शिवसैनिक हे आज शिवसेनेत चित्र आहे”, असे ट्विट करत माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली.