नवीन महाबळेश्वर प्रकल्प साकारणारच : पाटणकर

पाटण  – पाटण विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक हितासाठी पर्यटन विकास हेच खरे माध्यम आहे. येणाऱ्या काळात नवीन महाबळेश्वर पर्यटन प्रकल्प विकसित करणे हे आपले ध्येय आहे. हा प्रकल्प भविष्यकाळात आपण यशस्वीरित्या पूर्णत्वाला नेणार आहे. यातूनच येथे सार्वत्रिक नंदनवन साधले जाणार असल्याने आता हा प्रकल्प वाट्टेल ते झालेतरी तडीस नेणार असल्याचा विश्वास, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी पाटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.

ते म्हणाले, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी आघाडी शासनाच्या काळात या प्रकल्पाचा आराखडा तयार केला. यातूनच पाटणसह जावली व सातारा तालुक्‍यातील एकूण 52 गावांचा समावेश करण्यात आला. यात सर्वाधिक 29 गावे ही पाटण तालुक्‍यातील आहेत. स्वाभाविकच पर्यटन विकास व वाढ तसेच सातारा जिल्ह्याचा सर्वांगिण विकास या भावनेतून शासनाने या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाची नियुक्तीही केली होती. दुर्दैवाने त्यानंतर केवळ राजकीय आकसापोटी या प्रकल्पाला विरोध झाल्याने तो बारगळला. पाटणकरांनी त्याकाळी दाखवलेली दूरदृष्टी व पर्यटन विकास हा राज्य शासनाला उशिरा का होईना पण पटला आणि पुन्हा त्यांनी नव्याने याची अधिसूचना काढली आहे.

या प्रकल्पामुळे येथे सार्वत्रिक सुविधा होणार आहेत. रस्ते, पाणी, वीज आदी मुलभूत सुविधा तर मिळणार आहेतच याशिवाय येथे साडेतीन हजाराहून अधिक रोजगार व त्याचपटीत व्यवसाय निर्मितीही होणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांनाही आपले व्यवसाय, उद्योग सुरू करता येतील.
कोणताही प्रकल्प राबविताना सकारात्मक प्रयत्न, दूरदृष्टी व नियोजन याची गरज असते. सुदैवाने आजवर आपण जे प्रकल्प राबविले ते यशस्वी केले आपल्या चांगल्या प्रकल्पात खोडा घालणाऱ्यांनी कितीही नकारात्मक प्रयत्न केले तरीही विक्रमसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिकांच्या स्वप्नातील हा नवीन महाबळेश्वर प्रकल्प आपण वाट्टेल त्या परिस्थितीत साकार करणारच, अशी खात्रीही शेवटी सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.