डुक्‍करमुक्‍त पुण्यासाठी कर्नाटकातून ठेकेदार आयात

महापालिका स्वत: हतबल म्हणूनच बाहेरून बोलावणार

पुणे – डुक्‍कर पकडण्याचे सर्व उपाय करून थकल्यानंतर महापालिकेने थेट कर्नाटकातूनच ठेकेदार मागवला असून, त्यांच्या काही अटी शर्तींवर डुक्‍कर पकडण्याला त्यांना महापालिकेने परवानगी दिली आहे. तत्पूर्वी डुक्‍कर मालकांना महापालिकेने त्यासंबंधी नोटीसही बजावली आहे.

शहराला डुक्‍करमुक्‍त करण्यासाठी महापालिकेने हतबल होऊन अखेर अन्य राज्यातील डुक्‍कर पकडणाऱ्या ठेकेदारला आणण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील भटके डुक्‍कर पकडण्याचे काम कर्नाटकातील दुर्गाप्पा ढोणी या व्यक्‍तीला देण्याचा आणि त्या व्यक्‍तीला मनुष्यबळ आणि पोलीस बंदोबस्त देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून, तसे आदेशही काढण्यात आले आहेत.

शहराच्या विविध भागांमध्ये भटक्‍या डुक्‍करांची समस्या अतिशय गंभीर झाली आहे. ही डुक्‍करे नागरिकांना चावा घेत असल्याची आणि परिसर अस्वच्छ करत असल्याची तक्रार अनेकवेळा सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुख्यसभेत केली आहे. पूर्वीतर मुख्यसभेत डुक्‍कर सोडण्याचा प्रकारही घडला होता.

आरोग्य विभागाने कुत्र्यांना कसे पकडले जाते त्याप्रमाणे डुक्‍कर पकडण्याची मोहीम हाती घेतली. परंतु, पथकाच्या हातात एकही डुक्‍कर सापडले नाही. एवढेच नव्हे तर पथकाने असमर्थता दर्शवली. त्यानंतर त्यांना डुक्‍कर पकडण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय झाला. परंतु, तोही असफल ठरला. अखेर कर्नाटकातील ढोणी यांना हे काम देण्याचा निर्णय झाला होता. तमिळनाडूमधील मे. आर. राजकुमार यांनीही याबाबत तयारी दर्शवली होती.

महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व डुक्‍कर शहराबाहेर घेऊन जाण्याचे आवाहन 23 ऑगस्ट 2019 रोजी डुक्‍कर मालकांना केले होते. तसेच या तारखेनंतर जर रस्त्यावर डुक्‍करे आढळली तर ती महापालिकेच्या मालकीची असतील, त्यावर डुक्‍कर मालकांचा कोणताही अधिकार राहणार नाही, त्यांच्याबाबतचा निर्णय महापालिका घेईल, असाही इशारा जाहीर प्रकटनाद्वारे दिला होता. एवढेच नव्हे तर 58 डुक्‍कर व्यावसायिकांना
9 ऑगस्ट 2019 रोजी डुक्‍कर जप्त करण्याविषयीच्या नोटीसही दिली होती.

…तर डुक्‍कर गाडीला पोलीस बंदोबस्त
यानंतरही शहरातील डुक्‍करांची समस्या “जैसे थे’ होती. या संदर्भात उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी महापालिकेच्या अतिरिक्‍त आयुक्‍त रुबल अगरवाल यांच्याकडे विचारणा करून यासंदर्भात त्वरित पावले उचलण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार कर्नाटकातील ढोणी यांना शहरातील डुक्‍कर पकडण्याची परवानगी देण्याचा कार्यालयीन आदेश काढला. यामध्ये भटके डुक्‍कर पकडण्यासाठी ढोणी यांना महापालिकेचे मनुष्यबळ, वाहने आणि पोलीस बंदोबस्त देण्याचेही नमूद केले आहे. पकडलेल्या डुक्‍करांच्या गाडीला कर्नाटकच्या सीमेपर्यंत पोलीस बंदोबस्त दिला जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)