जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा “आप’ लढवणार

सातारा – आम आदमी पक्ष सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सागर भोगावकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

पत्रकात म्हटले आहे, आम आदमी पक्ष महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवणार असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले होते. सातारा जिल्ह्यातही पक्षाचे चांगले काम आहे. विविध आंदोलने व भ्रष्टाचाराविरोधात पक्षाने आवाज उठवला आहे. शोषित, वंचित, पीडितांना न्याय देण्याची पक्षाची भूमिका आहे.

पक्षाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही काम केले आहे. त्याचा सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक व विधानसभेला उपयोग होणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला विकासाच्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या कामाचाही पक्षाला फायदा होणार आहे. सातारा जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणुकीसह विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय आम आदमी पक्षाचे राज्य प्रचार समितीचे अध्यक्ष रंगा राचुरे, श्रीकांत आचारे, सुदर्शन कदम, सागर पाटील यांनी घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.