आमदार राजळेंना हटवा, अन्यथा वेगळा विचार

भाजपातील मुंडे यांच्या समर्थकांच्या बैठकीतील निर्णय
आ. राजळे यांच्या वितिरिक्त कुठलाही उमेदवार मान्य 

पाथर्डी – भाजपने शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात आमदार मोनिका राजळे यांना वगळता कोणालाही उमेदवारी द्यावी. तरच आपण कमळासोबत राहू, अन्यथा वेगळा विचार करू, अशी भूमिका पाथर्डी व शेवगाव तालुक्‍यातील भाजप निष्ठावंत मुंडे समर्थक व राजळे विरोधकांनी घेतली आहे. भाजप भटक्‍या विमुक्त आघाडीचे प्रदेशमंत्री राहुल कारखेले यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा एकमुखी निर्णय घेण्यात आला. तसेच ठरवलेली भूमिका ग्रामविकसमंत्री पंकजा मुंडे यांच्या कानावर घालण्यासाठी त्यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप अंतर्गत वाढलेली गटबाजी थांबण्याची चिन्हे नसून, यामुळे आमदार राजळे यांच्यासमोरील संकट अधिक गडद होताना दिसत आहे.

जुन्या भाजप कार्यकर्त्यांनी ग्रामविकासमंत्री मुंडे यांची काही दिवसांपूर्वी भेट घेऊन आ. राजळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत राजळे हटाव मोहिमेचा नारा दिला. त्यानंतर नुकतीच कारखेले यांच्या निवासस्थानी निवडक कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला ज्येष्ठ नेते अशोक गर्जे, जिल्हा परिषद सदस्य मोहनराव पालवे, माजी नगराध्यक्ष दिनकराव पालवे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव लांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सोनवणे, बाजार समितीचे माजी उपसभापती गहीनाथ शिरसाठ, पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, सरपंच संजय बडे, भाजप भटक्‍या विमुक्त आघाडीचे प्रदेश मंत्री राहुल कारखेले, धनंजय बडे, महेंद्र शिरसाठ, दत्तात्रय खेडकर, पाडळीचे सरपंच अशोक गर्जे, किसन आव्हाड, राजू नागरे, श्रीधर हंडाळ यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

अशोक गर्जे म्हणाले, तळागाळात जाऊन आम्ही पदरमोड करून पक्षवाढीचे प्रामाणिक काम केले. मात्र आ. राजळेंनी निष्ठावंतांना वेळोवेळी अपमानित केले. दिनकराव पालवे म्हणाले, पक्षवाढीसाठी आम्ही खस्ता खाल्ल्या. लाभ मात्र दुसरे उठवत आहेत. असेच सुरू राहिले, तर निष्ठावंतांनी फक्त सतरंज्या उचलायचा का? असा प्रश्‍न निर्माण होतो. नितीन काकडे म्हणाले, आ. राजळे सोडून कुणालाही उमेदवारी द्यावी. आपण कमळ चिन्हावर ठाम राहू. मोहनराव पालवे म्हणाले, पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर केली, तरच कमळा बरोबर राहू अन्यथा वेगळा विचार करावाच लागेल. बाळासाहेब सोनवणे म्हणाले, याबाबतची पुढची बैठक शेवगाव तालुक्‍यात आपल्या जिनिंगवर ठेवली आहे.

संजय बडे म्हणाले, ना. मुंडे यांना भेटून आपली भूमिका यापूर्वी आपण सर्वांनी मांडली आहे. आपल्या भूमिकेवर सर्वजण ठाम असल्याने पक्षनेतृत्वाला आपला निर्णय मान्य करण्यास आपण भाग पाडू. अमोल गर्जे म्हणाले, पक्षाने पुन्हा राजळे यांना उमेदवारी दिल्यास आपण कुठल्याही चिन्हावर उमेदवारी करून विधानसभा लढवणार आहोत. कारखेले म्हणाले, भाजप निष्ठावंत इच्छुकांची नावे प्रदेश पातळीवर पोहोचली आहेत. आ. राजळे सोडून कुणालाही उमेदवारी दिल्यास आपण सर्व ताकत लावून निवडून आणू.

संभाजी पालवे म्हणाले, यापुढील काळातही अशाच एकीच्या बळावर विधानसभेला इतिहास घडवून दाखवू. धनंजय बडे, गहीनाथ शिरसाठ, किसन आव्हाड यांनीही बैठकीत आपली भूमिका मांडली. भाजप अंतर्गत धुसफूस वाढू लागली आहे. जुन्या भाजपा कार्यकर्त्यांनी राजळे हटाव मोहीम दिवसेंदिवस तीव्र केल्याने भाजपाच्या उमेदवारीवरून उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्षाच्या गोटात उमेदवारीविषयी अद्याप सामसूम असले तरी भाजप अंतर्गत सुरू झालेल्या गटबाजीने राजकीय वातावरण तापले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)