Burning Train: नवी दिल्लीहून दरभंगाला जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील इटावाच्या सराय भूपत रेल्वे स्टेशनवर ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. छठ पूजेमुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांची ट्रेनमध्ये मोठी गर्दी होती. या आगीच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
मात्र या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेले नाही. सीपीआरओने दिलेल्या माहितीनुसार, इटावा स्टेशनपूर्वी सराय भूपत स्टेशन येथून ही ट्रेन जातअसताना स्टेशन मास्तरांनी एका स्लिपर कोचमधून धूर येत असल्याचे पाहिले होते. त्यानंतर स्टेशन मास्तरांनी वॉकी टॉकीच्या माध्यमातून ट्रेन ड्रायव्हर आणि गार्ड यांना याबाबतची माहिती देऊन ट्रेन थांबवली. तसेच पॉवर ऑफ करण्यात आले. त्यानंतर स्लिपर कोचमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. सतर्कता दाखवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
याबाबत एसएसपी विनय कुमार वर्मा म्हणाले, “नवी दिल्लीहून दरभंगाला जाणाऱ्या क्लोन एक्स्प्रेसच्या तीन बोगींना आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे. आग लागलेल्या बोगींमध्ये 1 स्लीपर क्लास आणि 2 जनरलचा समावेश आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तिन्ही बोगीतील आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे.”
एस-1 आणि एस-2 कोचमध्ये आग लागली. आग लागल्यानंतर कोचमध्ये चेंगराचेंगरी झाली. इंजिनसह इतर डबे वेगळे करण्यात आले आहेत. यावेळी प्रवाशांनी ट्रेनखाली उड्या मारुन आपला जीव वाचवला. या आगीत आठ जण भाजले आहेत. ज्यांना गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छठ पूजेमुळे डब्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. आगीमुळे काही प्रवाशांचे सामान जळून खाक झाले आहे.