नेवासा – शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात पक्ष भेदभाव न करता समस्या महत्वाची समजून विकास कामासाठी मागेल त्याला निधी देत मतदारसंघात मोठे विकासाभिमुख कार्य केल्यामुळे पुन्हा ते तिसऱ्यांदा लोकसभेत हॅटट्रिक करणार आहे.
त्यामुळे बाह्यशक्तीच्या राजकीय गोटात मोठा पोटसूळ उभा राहिला आहे. ज्यांचा सेनेशी कवडीचाही काही संबंध नाही, अशा चुलबुल पांडे लोकांना पोटसूळ भरणाऱ्या कथाकथित लोक सेनेचा खोटा बुरखा पांघरून पडद्याआडून खासदार लोखंडे यांच्यावर टीकास्त्र सोडण्याचा प्रताप करत आहे. त्यांचा बोलवता धनी कोण आहे? हे समजण्याइतपत शिर्डी लोकसभा मतदार संघातील जनता दुधखुळी नाही, असा स्पष्ट इशारा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, नेवासा शहरप्रमुख बाबा कांगुणे, युवा सेनेचे नेते शुभम उगले यांनी विरोधकांना दिला.
पवार व कांगुणे म्हणाले की, खासदार लोखंडे कामाचा माणूस असल्याची जनभावना जिल्ह्यात सर्वश्रूत असताना काही लोक सेनेत असल्याचे ढोंग करून आपली कुटनिती आखून पक्षशिस्तीचा भंग करू पाहत आहेत. त्यामुळे त्यांची समाजात किती कुवत आणि जनाधार आहे, याचे आत्मपरीक्षण करूनच बोलावे, असा सल्ला देत ‘कंहॉ राजाभोज और कंहा गंगू तेली’ असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
खासदार लोखंडे यांची सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडली गेलेली असून जनतेचे प्रश्न मार्गी लावणारे खासदार म्हणून त्यांची मतदारसंघात ओळख निर्माण झालेली आहे. असे असताना त्यांना पुन्हा मोठा जनाधार मिळत असल्यामुळे चुलबुल पांडे लोक दुसऱ्यांचे ऐकून दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून खासदार लोखंडे यांच्यावर टीकास्र सोडत आहे. हा उद्योग त्यांनी आता बंद करावा. बिनबुडाचे आरोप केल्यास याद राखा, असा सज्जड इशाराही संपर्कप्रमुख पवार, शहरप्रमुख कांगुणे व उगले यांनी दिला.