नेवासा – गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचे ५६ लाख रुपये कृषी विभागाने केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाले असून ते अनुदान लवकरच मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारशांच्या खात्यावर वर्ग होतील, अशी माहिती नेवासा तालुका कृषी विभागाचे कृषी अधिकारी धनंजय हिरवे यांनी दिली.
कृषी अधिकारी धनंजय हिरवे यांनी सांगितले की, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी सन २२-२३ या वर्षात मयत झालेल्या शेतकरी कुटूंबातील एकूण २३ वारसांना ४६ लाख रुपये अनुदान मंजूर झाले ते अनुदान वारसांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले.
सन २०२३-२४ मध्ये सानुग्रह योजनेतील ११ प्रकरणांना मंजुरी मिळाली त्यापैकी ६ लाभार्थीचे १२ लाखाचे अनुदान मिळाले असून ते मयत वारसांच्या खात्यावर जमा होऊन मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना ते लवकरच प्राप्त होईल.
शेतकरी कुटुंबातील व्यक्तीचा अपघाती, बुडून, सर्प दंशाने अकस्मात मृत्यू झाल्यास त्यास शासन गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेच्या अंतर्गत दोन लाखाची मदत मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसाला शासन देते. एखाद्या शेतकरी कुटूंबातील व्यक्तींवर अचानक आघात होऊन त्याचे निधन झाल्यास आम्ही कृषी विभागाच्या मार्फत प्रस्ताव दाखल झाल्यानंतर पुण्याचे कार्य समजून तत्परतेने कार्यवाही करून मदत करण्यासाठी कृषी विभाग व आमचा स्टाफ प्रयत्नशील असल्याचेही कृषी अधिकारी धनंजय हिरवे यांनी सांगितले.