सातारा – आत्याने जेवण दिले नाही, या कारणावरून संतापलेल्या भाच्याने काठीने मारहाण करत वृद्ध आत्याचा खून करण्याची घटना बसाप्पाचीवाडी (ता. सातारा) येथे आज (दि.30) उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.
वत्सला नामदेव बाबर (वय 70) यांचा खून झाला असून हरिभाऊ सुरेश चव्हाण (वय 30, दोघे रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) संशयित आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी की, वत्सला नामदेव बाबर व भाचा हरिभाऊ दोघे एकत्र गावात राहत होते.
हरिभाऊ किरकोळ कामे करत होता. त्याला दारुचे व्यसन असून त्यातून दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती. सोमवारी रात्री उशिरा त्याने जेवण मागितल्यानंतर आत्याने दिले नाही. त्यामुळे त्याने लाकडी दांडक्याने आत्याला मारहाण केली. या हल्ल्यात ही वृद्ध महिला गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. खुनाची घटना मंगळवारी उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दुपारी संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांचा घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. संशयिताला अटक करण्यात आली आहे.