कराड, (प्रतिनिधी) – नांदगाव, ता. कराड येथे घरात कोंडून ठेवलेल्या बहिणीला सोडवायला गेलेल्या सुनील बाबुराव थोरात (वय 56, रा. थोरात मळा, ओंड, ता. कराड) यांच्यावर त्यांचा भाचा नीलेश ज्योतिराम पाटील याने बुधवारी (दि. 28 फेब्रुवारी) सायंकाळी सुर्याने वार केला. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, सुनील थोरात यांची बहीण विमल पाटील नांदगाव येथे राहते. विमल यांना त्यांचा मुलगा नीलेशने बुधवारी (दि. 28) घरात कोंडून ठेवले होते. याची माहिती त्यांच्या शेजारी शालन यादव यांनी सुनील थोरात यांना दिली.
त्यामुळे बहिणीला सोडवायला सुनील थोरात हे नांदगावला गेले. त्यावेळी नीलेशने त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी करून, घरातील सुर्याने हातावर वार केले. यामध्ये थोरात हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी थोरात यांनी फिर्याद दिली असून, हवालदार उत्तम खराडे तपास करत आहेत.